अफगाणिस्तानशी, उपांत्य प्रवेशाची संधी
वृत्तसंस्था/ मुंबई
विश्वचषकाच्या उपांत्य फेरीसाठी जागा वेगाने भरल्या जात असताना ऑस्ट्रेलियाचा सामना आज मंगळवारी येथे अफगाणिस्तानशी होणार असून यावेळी मधल्या फळीतील अडचणी दूर करण्याच आणि अंतिम चार संघांतील स्थान पक्के करण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न राहील. विश्वचषकातील गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलेल्या भारतासोबत दक्षिण आफ्रिकेनेही उपांत्य फेरीसाठी पात्रता मिळवली आहे. त्यामुळे केवळ दोन स्थाने राहिली आहेत.
उपांत्य फेरीपर्यंतच्या ऑस्ट्रेलियाच्या प्रगतीत इतर कोणत्याही संघाचा थेट अडथळा येईल असे सकृतदर्शनी दिसत नसून पॅट कमिन्सचे खेळाडू आज वानखेडे स्टेडियमवर मिळणाऱ्या संधीचा पुरेपूर लाभ घेऊन हे उद्दिष्ट पूर्ण करू पाहतील. हे ठिकाण फलंदाजीचे नंदनवन असले, तरी गोलंदाज परिस्थितीचा फायदा उठविण्यास सक्षम राहिल्यास त्यांनाही मदत मिळालेली आहे. अफगाणिस्तानचा प्रभावी फिरकी मारा आणि चांगली फलंदाजी करण्याची क्षमता यामुळे ही लढत लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियातर्फे लेगस्पिनर अॅडम झॅम्पाने सात सामन्यांतून 19 बळी मिळविलेले असून गोलंदाजांमध्ये तो आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाला त्यांच्या उर्वरित दोन सामन्यांतून (आधी अफगाणिस्तान आणि नंतर बांगलादेश) उपांत्य फेरी गाठण्यासाठी फक्त एक विजय आवश्यक आहे. या पाच वेळच्या विजेत्यांना यावेळी सर्वोत्कृष्ट कामगिरी करता आलेली नसली, तरी सलग पाच विजयांमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. मात्र ऑस्ट्रेलियाची मधली फळी अद्याप चमकू शकलेली नाही. स्टीव्ह स्मिथ (एक अर्धशतक) आणि मार्नस लाबुशेन (दोन अर्धशतके) हे एकदिवसीय क्रिकेटचे तज्ञ फलंदाज म्हणून ओळखले जात नसले, तरी या फलंदाजांनी मिळून फक्त तीन अर्धशतके नोंदविलेली आहेत. पण अहमदाबादच्या खेळपट्टीवर या दोघांनी केलेली फलंदाजी पाहता अफगाणिस्तानविऊद्ध त्यांच्या मजबूत पुनरागमनाची आशा संघाला असेल.
ऑस्ट्रेलियाची भक्कम बाजू म्हणजे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (428 धावा) फॉर्मात असून ट्रॅव्हिस हेडनेही दमदार सुऊवात (दोन सामन्यांत 120 धावा) केलेली आहे. मिचेल मार्शच्या पुनरागमनामुळे संघाला अष्टपैलू कॅमेरुन ग्रीन फॉर्मात नसल्याने येणाऱ्या समस्या दूर करता येतील. दुसरीकडे, गेल्या पाच सामन्यांमध्ये चार विजय मिळवून अफगाणी संघाने उपांत्य फेरीचे स्वप्न जिवंत ठेवले आहे, कर्णधार हशमतुल्ला शाहिदी (282 धावा), रहमत शाह (264), अजमतुल्ला उमरझाई (234), रहमानउल्ला गुरबाज (234) व इब्राहिम झद्रान(232) यांनी फलंदाजीत दाखवलेल्या सातत्यामुळे अफगाणिस्तानने लक्ष्याचा पाठलाग करताना लागोपाठ तीन विजय मिळवले आहे. पण ऑस्ट्रेलियाला तोंड देणे ही वेगळी बाब असेल. अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज रशिद खान (7 बळी) गोलंदाजी व फलंदाजीतही त्याच्या क्षमतेला न्याय देऊ शकलेला नाही.
संघ-ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, सीन अॅबॉट, अॅश्टन आगर, कॅमेरुन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मिच मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झॅम्पा, मिचेल स्टार्क.
अफगाणिस्तान : हश्मतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमतुल्ला उमरझाई, रशिद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फाऊखी, अब्दुल रहमान, नवीन उल हक.
सामन्याची वेळ : दुपारी 2 वा.









