दुखापतीमुळे उर्वरित मालिकेला मुकणार : तिसऱ्या कसोटीसाटी टॉड मर्फीला संधी
वृत्तसंस्था/ लंडन
प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या अॅशेस कसोटी मालिकेतील दुसरा सामना रविवारी (2 जुलै) समाप्त झाला. क्रिकेटची पंढरी मानल्या जाणऱ्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 43 धावांनी विजय मिळवत, मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. असे असले तरी आता मालिकेतील उर्वरित तीन सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियन संघाचा प्रमुख फिरकीपटू नॅथन लायन हा दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला. विशेष म्हणजे आपल्या कारकिर्दीची सुरुवात केल्यानंतर प्रथमच तो संघाचा भाग नसेल. लायनच्या जागी ऑसी संघ व्यवस्थापनाने टॉड मर्फीला संघात संधी दिली आहे.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातीत पहिला कसोटी सामना एजबस्टन स्टेडियमवर खेळला गेला होता. नॅथन लायन ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला होता. लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीतही लायन आपल्या फिरकीची कमाल दाखवू शकत होता. पण दुखापतीमुळे त्याला हा सामना अर्ध्यात सोडावा लागला. लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी त्याला ही दुखापत झाली, ज्यामुळे तो व्यवस्थित चालू शकत नव्हता. लायनची ही दुखापत गंभीर असून संपूर्ण मालिकेतून त्याला माघार घ्यावी लागली आहे. अशात राहिलेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये त्याच्या जागी युवा टॉड मर्फी ऑस्ट्रेलियन प्लेइंग इलेव्हनचा भाग असू शकतो.
टॉड मर्फीने आपल्या कसोटी पदार्पणाच्या मालिकेत भारताविरुद्ध 14 विकेट्स घेतल्या होत्या. 22 वर्षीय मर्फीने यावर्षीच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये कसोटी पदार्पण केले. मालिकेतील चार सामन्यांमध्ये त्याने 14 विकेट्स घेतल्या. यात विराटला त्याने चार वेळा बाद केले. ऑस्ट्रेलियन संघात अजून एक मोठा बदल म्हणजे मॅथ्यू रेनशॉ याला संघातून वगळण्यात आले आहे. संघात मायकेल नेसन आणि यष्टीरक्षक जिमी पीरसन यांना सामील केले गेले आहे. दरम्यान, अॅशेस मालिकेतील तिसरा सामना हेडिंग्लेच्या लीड्स स्टेडियमवर दि. 6 ते 10 जुलैदरम्यान खेळवला जाणार आहे.
ऑस्ट्रेलियन कसोटी संघ – पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अॅलेक्स केरी (यष्टीरक्षक), कॅमरून ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेजलवूड, ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, मिचेल मार्श, टॉड मर्फी, मायकेल नेसर, जिमी पीरसन (यष्टीरक्षक), स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिशेल स्टार्क, डेविड वार्नर.









