वृत्तसंस्था/ सिडनी
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे प्रमुख प्रशिक्षक अँड्रय़ू मॅकडोनाल्ड यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मंगळवारी दिली. ऑस्ट्रेलियन संघाचा लंकन दौरा 7 जूनपासून सुरू होणार असून प्रशिक्षक मॅकडोनाल्ड पहिल्या टप्प्यात सहभागी होऊ शकणार नाहीत.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे प्रमुख प्रशिक्षक मॅकडोनाल्ड यांची मंगळवारी सकाळी कोरोना चाचणी घेण्यात आली आणि त्यामध्ये ते पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. मॅकडोनाल्ड यांना आता सात दिवस मेलबर्नमध्ये विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. विलगीकरणाचा कालावधी झाल्यानंतर मॅकडोनाल्ड यांची पुन्हा एकदा कोरोना चाचणी घेतली जाईल. त्यानंतरच ते ऑस्ट्रेलियन पथकात दाखल होऊ शकतील, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने सांगितले. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ लंकेच्या दौऱयात दोन कसोटी सामने तसेच तीन टी-20 सामने खेळणार आहे.









