वृत्तसंस्था/ मेलबोर्न
ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघाचा कर्णधार ऍरॉन फिंचने मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीची अधिकृत घोषणा केली. फिंचच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने आयसीसीची पुरुषांची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा पहिल्यांदा जिंकली होती.
ऍरॉन फिंचने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत क्रिकेटच्या सलग टी-20 प्रकारात विक्रमी 76 सामन्यात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले असून तसेच त्याने 55 वनडे सामन्यातही ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले आहे. फिंचने 254 आंतरराष्ट्रीय सामन्यात आंतरराष्ट्रीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व केले आहे. क्रिकेटच्या विविध प्रकारात 5 कसोटी, 146 वनडे आणि 103 टी-20 सामन्यात कर्णधारपद भूषविले आहे. 2024 साली होणाऱया आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपर्यंत आपण खेळू शकणार नाही याची जाणीव मला झाल्याने आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्तीचा निर्णय योग्यवेळी घेतल्याचे फिंचने म्हटले आहे.
असंख्य चाहत्यांनी नेहमीच मला प्रोत्साहन दिल्यामुळे मी माझी आंतरराष्ट्रीय कारकीर्द यशस्वी करू शकलो याबद्दल फिंचने क्रिकेट शौकिनांचे आभार मानले आहे. 2011 च्या जानेवारी महिन्यात इंग्लंडविरुद्ध फिंचने टी-20 विरुद्धच्या सामन्यात आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. फिंचने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत एकूण 8804 धावा जमवल्या असून त्यामध्ये वनडे प्रकारातील 17, टी-20 प्रकारातील दोन शतकांचा समावेश आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात फिंचने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती पण त्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याच्याकडे टी-20 संघाचे नेतृत्व ठेवण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत फिंचची कामगिरी निराशाजनक झाली होती. फिंचने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना आयर्लंडविरुद्ध खेळताना 63 धावा जमवल्या होत्या. पण तरीही ऑस्ट्रेलियाला टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरी गाठला आली नव्हती. 2020 च्या कालावधीत ऍरॉन फिंच हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सुपरस्टार म्हणून ओळखला गेला. तसेच त्याची आयसीसीच्या टी-20 सर्वोत्तम क्रिकेटपटूसाठी शिफारस करण्यात आली होती. 2018 साली हरारे येथे झालेल्या झिंबाब्वे विरुद्धच्या सामन्यात फिंचने 76 चेंडूत 172 धावा झोडपल्या होत्या. टी-20 प्रकारातील फिंचचा हा विश्वविक्रम असून या खेळीमध्ये त्याने 10 षटकार आणि 16 चौकार मारले होते. 2013 साली इंग्लंड विरुद्ध झालेल्या टी-20 सामन्यात फिंचने 63 चेंडूत जलद 156 धावा झळकवल्या होत्या. टी-20 प्रकारातील फिंचची ही तिसऱया क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या ठरली. 2021 साली झालेल्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा अजिंक्यपद मिळवले होते. तसेच 2015 साली मायभूमीत आयसीसीची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकलेल्या ऑस्ट्रेलियन संघात त्याचा समावेश होता. फिंचने तब्बल 12 वर्षे ऑस्ट्रेलियन संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. 36 वर्षीय फिंचने 2015 च्या आयसीसीच्या पुरुषांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला जेतेपद मिळवून देण्यात तसेच 2021 साली आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत त्याने कर्णधार या नात्याने चोख कामगिरी बजावली होती.









