कोलंबो (लंका)
यजमान लंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जात आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिला सामना 10 गडय़ांनी जिंकून लंकेवर 1-0 अशी आघाडी मिळविली आहे. आता या मालिकेतील होणाऱया दुसऱया सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज ऍस्टॉन ऍगर दुखापतीमुळे खेळू शकणार नाही.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या दुसऱया कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या 17 जणांच्या संघामध्ये जखमी ऍगरच्या जागी जॉन हॉलंडचा बदली खेळाडू म्हणून समावेश केला आहे. ऍगरच्या गैरहजेरीमुळे ऑस्ट्रेलियन संघातील फिरकी गोलंदाज स्वेप्सन दुसऱया कसोटीसाठी संघातील जागा राखेल, असा अंदाज आहे. ऑस्ट्रेलिया आणि लंका यांच्यातील दुसरी कसोटी येत्या शुक्रवारपासून खेळविली जाणार आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटीत फिरकी गोलंदाज स्वेपसनने 5 बळी मिळविले होते.









