अॅनाबेल सुदरलँडला ‘मालिकावीर-सामनावीर’चा बहुमान
वृत्तसंस्था / वेलिंग्टन
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाने यजमान न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव केला. ऑस्ट्रलियाच्या अॅनाबेल सुदरलँडने ‘सामनावीर आणि मालिकावीर’ असा दुहेरी मुकुट साधला. या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा 75 धावांनी पराभव केला. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे वाया गेला होता.
तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचा डाव 49 षटकात 290 धावांत आटोपला. त्यानंतर न्यूझीलंड संघाला 43.3 षटकात 215 धावांपर्यंत मजल मारता आल्याने त्यांना हा सामना आणि मालिका गमवावी लागली.
ऑस्ट्रेलियाच्या डावामध्ये लीचफिल्ड आणि गार्डनर यांनी शानदार अर्धशतके झळकविली. गार्डनरने 62 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांसह 74 तर लिचफिल्डने 59 चेंडूत 5 चौकारांसह 50 धावा जमविल्या. सुदरलँडने 43 चेंडूत 6 चौकारांसह 42, कर्णधार हिलीने 44 चेंडूत 4 चौकारांसह 39, पेरीने 2 चौकारांसह 14, मॅकग्राने 10 तर गॅरेथने 10 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावात 36 आवांतर धावा नोंदविल्या गेल्या. त्यामध्ये 33 वाईड चेंडूंचा समावेश आहे. हिली आणि लिचफिल्ड यांनी सलामीच्या गड्यासाठी 88 धावांची भागिदारी केली. सुदरलँड आणि गार्डनर यांनी पाचव्या गड्यासाठी 63 धावांची भर घातली. न्यूझीलंडतर्फे मेअरने 58 धावांत 3 तर अॅमेलिया केरने 54 धावांत 4 आणि डिव्हाईनने 49 धावांत 2 गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाच्या डावात 1 षटकार आणि 27 चौकार नोंदविले गेले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडच्या डावात सलामीच्या सुझी बेटसने 59 चेंडूत 8 चौकारांसह 53, जेम्सने 4 चौकारांसह 24, अॅमेलिया केरने 1 चौकारांसह 22, कर्णधार डिव्हाईनने 2 चौकारांसह 25, हॅलिडेने 4 चौकारांसह 27 तर मॅडी ग्रीनने 3 चौकारांसह नाबाद 39 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाच्या अचूक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचे गोलंदाज ठरावित अंतराने बाद झाले. ऑस्ट्रेलियातर्फे सुदरलँड आणि किंग यांनी प्रत्येकी 3 तर गॅरेथ आणि ब्राऊन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. न्यूझीलंडच्या डावात 22 चौकार नोंदविले गेले.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया 49 षटकांत सर्वबाद 290 (लिचफिल्ड 50, गार्डनर 74, हिली 39, सुदरलँड 42, पेरी 14, मॅकग्रा 10, गॅरेथ 10 अवांतर 36, अॅमेलिया केर 4-54, मेअर 3-58, डिव्हाईन 2-49), न्यूझीलंड 43.3 षटकात सर्वबाद 215 (बेट्स 53, जेम्स 24, अॅमेलिया केर 22, डिव्हाईन 25, हॅलिडे 27, ग्रीन नाबाद 39, अवांतर 16, सुदरलँड 3-39, किंग 3-34, गॅरेथ 1-33, ब्राऊन 1-30)









