बेथ मुनीचे नाबाद अर्धशतक, भारताचा 9 गडय़ांनी पराभव
वृत्तसंस्था/ नवी मुंबई
येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियन महिला संघाने यजमान भारताचा 9 गडय़ांनी दणदणीत पराभव करून विजयी सलामी दिली. ऑस्ट्रेलियन संघाची सलामीची फलंदाज बेथ मुनीने 57 चेंडूत 16 चौकारांसह नाबाद 89 धावा झळकविल्या.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिला संघाने 20 षटकात 5 बाद 172 धावा जमविल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 18.1 षटकात 1 बाद 173 धावा जमवित हा सामना 11 चेंडू बाकी ठेवून 9 गडय़ांनी जिंकला.
भारताच्या डावामध्ये शेफाली वर्माने 10 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 21, स्मृती मंदानाने 22 चेंडूत 5 चौकारांसह 28, कर्णधार हरमनप्रित कौरने 23 चेंडूत 2 चौकारांसह 21, देविका वैद्यने 24 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 25, रिचा घोषने 20 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 36, दीप्ती शर्माने 15 चेंडूत 8 चौकारांसह नाबाद 36 धावा झळकविल्या. भारताच्या डावामध्ये 5 षटकार आणि 23 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियातर्फे इलेसी पेरीने 2 तर गॅरेथ, गार्डनर आणि सुदरलँड यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना कर्णधार ऍलीसा हिली आणि बेथ मुनी यांनी पहिल्या चेंडूपासूनच फटकेबाजीवर अधिक भर देताना 8.5 षटकात 73 धावांची भागीदारी केली. देविका वैद्यने हिलीला कौरकरवी झेलबाद केले. तिने 23 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 37 धावा जमविल्या. हिली बाद झाल्यानंतर बेथ मुनी आणि मॅकग्रा या जोडीने दुसऱया गडय़ासाठी अभेद्य शतकी (100) भागीदारी करत आपल्या संघाला 11 चेंडू बाकी ठेवून 9 गडय़ांनी विजय मिळवून दिला. मुनीने 57 चेंडूत 16 चौकारांसह नाबाद 89 तर मॅकग्राने 29 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 40 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावात 3 षटकार आणि 24 चौकार नोंदविले गेले. भारतातर्फे देविका वैद्यने 33 धावात 1 गडी बाद केला. बेथ मुनीला 4 धावांवर असताना भारताकडून जीवदान मिळाले. या जीवदानाचा लाभ घेत तिने नाबाद अर्धशतक झळकविले. मुनीने रेणुका सिंगच्या एका षटकात तीन सलग चौकार ठोकले. तसेच कर्णधार हिलीला भारताने जीवदान दिले होते. या जीवदानाचा लाभ घेत तिने 37 धावा जमविल्या. 2014 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारी देविका वैद्यचा हा पहिला टी-20 सामना होता.
संक्षिप्त धावफलक
भारत 20 षटकात 5 बाद 172 (शेफाली वर्मा 21, स्मृती मंदाना 28, हरमनप्रित कौर 21, देविका वैद्य नाबाद 25, रिचा घोष 36, दीप्ती शर्मा नाबाद 36, पेरी 2-10, गॅरेथ, सुदरलँड, गार्डनर प्रत्येकी 1 बळी), ऑस्ट्रेलिया 18.1 षटकात 1 बाद 173 (बेथ मुनी नाबाद 89, ऍलीसा हिली 37, ताहिला मॅकग्रा नाबाद 40, देविका वैद्य 1-33).









