इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिका : ताहलिया मॅकग्रा सामनावीर, डॅनी वॅट-हॉजचे अर्धशतक वाया
वृत्तसंस्था/कॅनबेरा
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाने इंग्लंडवर 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली. या मालिकेतील गुरुवारी खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने डकवर्थ लेविस नियमाच्या आधारे इंग्लंडचा 6 धावांनी पराभव केला. या सामन्यात 35 चेंडूत नाबाद 48 धावा झळकविणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या ताहलिया मॅकग्राला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी दिली. ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 5 बाद 185 धावा जमविल्या. त्यानंतर खराब हवामानामुळे काही कालावधीचा खेळ वाया गेल्याने पंचांनी इंग्लंडला 19.1 षटकात 175 धावांचे नवे उद्दिष्ट दिले. इंग्लंडने 19.1 षटकात 4 बाद 168 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 6 धावांनी गमवावा लागला. या मालिकेतील ऑस्ट्रेलियाचा हा सलग दुसरा विजय आहे. ऑस्ट्रेलियाच्या डावात बेथ मुनीने 31 चेंडूत 7 चौकारांसह 44, लिचफिल्डने 11 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह 18, कर्णधार मॅकग्राने 35 चेंडूत 8 चौकारांसह नाबाद 48 तर हॅरीसने 17
चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 35 धावा झळकविल्या. ऑस्ट्रेलियाला 16 अवांतर धावा मिळाल्या. मुनी आणि व्हॉल यांनी सलामीच्या गड्यासाठी 47 धावांची भागिदारी 5 षटकात केली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे मधल्या फळीतील 3 फलंदाज लवकर बाद झाले. त्यांची एकवेळ स्थिती 4 बाद 75 अशी होती. त्यानंतर लिचफिल्ड आणि सदरलँड यांनी पाचव्या गड्यासाठी 39 धावांची भागिदारी केली. सदरलँडने 11 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह 18 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाची यावेळी स्थिती 14.1 षटकात 5 बाद 114 अशी होती. मॅकग्रा आणि हॅरीस यांनी सहाव्या गड्यासाठी अभेद्य 71 धावांची भागिदारी केली. ऑस्ट्रेलियाच्या डावात 4 षटकार आणि 21 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडतर्फे डीनने 2 तर केम्प, इक्लेस्टोन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. ऑस्ट्रेलियाने पॉवरप्लेच्या 6 षटकात 54 धावा जमविताना 1 गडी गमविला. ऑस्ट्रेलियाचे अर्धशतक 33 चेंडूत तर शतक 75 चेंडूत, दीड शतक 108 चेंडूत फलकावर लागले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडच्या डावामध्ये सलामीच्या बाऊचरने 14 चेंडूत 2 चौकारांसह 13, वॅट हॉजने शानदार फलंदाजी करताना 40 चेंडूत 6 चौकारांसह 52, डंक्लेने 22 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 32, नॅट सिव्हेर ब्रंटने 20 चेंडूत 2 चौकारांसह 22 धावा जमविल्या. कर्णधार हीदर नाईटने 19 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 43 धावा केल्या. हॉज आणि डंक्ले यांनी दुसऱ्या गड्यासाठी 52 धावांची भागिदारी केली. तर नॅट सिव्हेर ब्रंट आणि नाईट यांनी चौथ्या गड्यासाठी 65 धावांची भर घातली. हॉजने 36 चेंडूत 8 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. मात्र हॉजचे अर्धशतक वाया गेले. इंग्लंडच्या डावामध्ये 2 षटकार आणि 22 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडचे अर्धशतक 41 चेंडूत, शतक 79 चेंडूत तर दीड शतक 108 चेंडूत फलकावर लागले. ऑस्ट्रेलियातर्फे मेगन शूटने 32 धावांत तर गार्थ आणि सदरलँड यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया 20 षटकात 5 बाद 185, (मुनी 44, लिचफिल्ड 17, सदरलँड 18, मॅकग्रा नाबाद 48, हॅरिस नाबाद 25, अवांतर 16 (डीन 2-28, केम्प 1-21, इक्लेस्टोन 1-33), इंग्लंड (सुधारीत उद्दिष्ट 19.1 षटकांत 175 धावा), 19.1 षटकात 4 बाद 168 (बाऊचर 13, डॅनी वॅट-हॉज 52, डंक्ले 32, नॅट सिव्हेर ब्रंट 22, नाईट नाबाद 43, अवांतर 6, शूट 2-32, सदरलँड आणि गार्थ प्रत्येकी 1 बळी









