दुसऱ्या वनडेत इंग्लंडवर 21 धावांनी मात, अॅलाना किंग ‘सामनावीर’, पेरीचे अर्धशतक
वृत्तसंस्था / मेलबर्न
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियन महिला संघाने इंग्लंडवर 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली. या मालिकेतील मंगळवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यान ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 21 धावांनी विजय मिळविला. ऑस्ट्रेलियाच्या अॅलाना किंगला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. या मालिकेतील ऑस्ट्रेलियाचा हा सलग दुसरा विजय आहे.
मंगळवारच्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी दिली. इंग्लंडच्या अचूक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचा डाव 44.3 षटकात 180 धावांत आटोपला. पण त्यानंतर गोलंदाजीस अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी इंग्लंडला 48.1 षटकात 159 धावांवर रोखून हा सामना 21 धावांनी जिंकला. या विजयामुळे ऑस्ट्रेलियन महिला संघाने मालिका हस्तगत केली आहे.
या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या डावात एलीस पेरीने 74 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 60, लीचफिल्डने 50 चेंडूत 3 चौकारांसह 29, कर्णधार हिलीने 19 चेंडूत 6 चौकारांसह 29, मुनीने 1 चौकारासह 12, सदरलॅँडने 1 षटकारासह 11 आणि अॅलाना किंगने 1 चौकारांसह 13 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावात 3 षटकार आणि 16 चौकार नोंदविले गेले. पहिल्या पॉवरप्लेमध्ये ऑस्ट्रेलियाने 1 गडी गमविताना 53 धावा जमविल्या. पेरीने 52 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह अर्धशतक झळकविले. लिचफिल्ड आणि पेरी यांनी दुसऱ्या गड्यासाठी 49 धावांची भागिदारी केली. इंग्लंडतर्फे इक्लेस्टोनने 35 धावांत 4 तर कॅप्सेने 22 धावांत 3 तसेच बेलने 25 धावांत 2 आणि फिलरने 46 धावांत 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडच्या डावामध्ये अॅमी जोन्स आणि नॅट सिव्हेर ब्रंट यांच्याकडून थोडाफार प्रतिकार झाला. जोन्सने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 103 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 47 तर ब्रंटने 57 चेंडूत 5 चौकारांसह 35, कर्णधार नाईटने 2 चौकारांसह 18, बाऊचरने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 17 आणि कॅप्सेने 2 चौकारांसह 14 धावा केल्या. ऑस्ट्रेलियातर्फे अॅलाना किंगने 25 धावांत 4 तर गार्थने 37 धावांत 3 तसेच शुट आणि गार्डनर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. इंग्लंडने पहिल्या पॉवरप्ले दरम्यान 43 धावा जमविताना 2 गडी गमविले. इंग्लंडच्या डावामध्ये 2 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. यजमान ऑस्ट्रेलियन महिला संघ आता ही मालिका एकतर्फी जिंकण्यासाठी प्रयत्न करेल.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया 44.3 षटकात सर्वबाद 180 (पेरी 60, लिचफिल्ड 29, हिली 29, सदरलँड 11, मुनी 12, किंग 13, अवांतर 10, इक्लेस्टोन 4-33, कॅप्से 3-22, बेल 2-25, फिलर 1-46), इंग्लंड 48.1 षटकात सर्वबाद 159 (नॅट सिव्हेर ब्रंट 35, जोन्स नाबाद 47, नाईट 18, बाऊचर 17, कॅप्से 14, अवांतर 14, किंग 4-25, गार्थ 3-37, शुट 1-27, गार्डनर 1-23)









