वृत्तसंस्था/ बर्मिंगहॅम
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर असून उभय संघामध्ये 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील शनिवारी रात्री झालेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन यजमान इंग्लंडचा शेवटचा चेंडू बाकी असताना 4 गड्यांनी पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियातर्फे बेथ मुनीने नाबाद अर्धशतक (61) झळकवले.
इंग्लंडच्या दौऱ्यामध्ये या मालिकेपूर्वी उभय संघात झालेल्या अॅशेस मालिकेतील एकमेव कसोटी ऑस्ट्रेलियन महिला संघाने जिंकली आहे. आता टी-20 मालिकेतही ऑस्ट्रेलियाने विजयी सलामी देऊन आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे.
या पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी दिली. इंग्लंडने 20 षटकात 7 बाद 153 धावा जमवल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 19.5 षटकात 6 बाद 154 धावा जमवत निसटता विजय नोंदवला.
इंग्लंडच्या डावामध्ये सलामीच्या डंक्लेने 49 चेंडूत 6 चौकारासह 56, कर्णधार नाईटने 22 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारासह 29, जोन्सने 21 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारासह नाबाद 40 धावा जमवल्या. वेटने 7 तर कॅप्सेने 3, नॅट स्किव्हेर ब्रंटने 7 धावा केल्या. इंग्लंडच्या डावात 3 षटकार आणि 15 चौकार नोंदवले गेले. ऑस्टेलियातर्फे जोनासेनने 25 धावात 3, स्कूटने 33 धावात 2 तर मॅकग्राने 9 धावात 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाच्या डावात कर्णधार हिली 5 धावावर बाद झाल्यानंतर मुनी आणि मॅकग्रा यांनी दुसऱ्या गड्यासाठी 49 धावांची भागीदारी केली. मॅकग्राने 29 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारासह 40 धावा जमवल्या. मॅकग्रा बाद झाल्यानंतर गार्डनरने मुनीसमवेत तिसऱ्या गड्यासाठी 61 धावांची भर घातली. गार्डनरने 23 चेंडूत 2 षटकारासह 31 धावा जमवल्या. ती 17 व्या षटकात बाद झाली. या षटकातील पुढच्या चेंडूवर इंग्लंडच्या ग्लेनने हॅरीसचा त्रिफळा उडवला. 19 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर बेलने पेरीला 7 धावावर त्रिफळाचित केले. सदरलँडने 6 चेंडूत 2 चौकारासह 9 धावा जमवल्या. शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर इक्लेस्टोनने सदरलँडला झेलबाद केले. यावेळी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडच्या धावसंख्येशी बरोबरी केली होती. वेरहॅमने पुढील चेंडूवर विजयी धाव घेत इंग्लंडचे आव्हान संपुष्टात आणले. मुनीने 47 चेंडूत 9 चौकारासह नाबाद 61 धावा झळकवल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावात 3 षटकार आणि 18 चौकार नोंदवले गेले. इंग्लंडतर्फे बेल, इक्लेस्टोन आणि ग्लेन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड 20 षटकात 7 बाद 153 (डंक्ले 56, नाईट 29, जोन्स नाबाद 40, अवांतर 5, जोनासेन 3-25, स्कूट 2-33, मॅकग्रा 1-9), ऑस्ट्रेलिया 19.5 षटकात 6 बाद 154 (मुनी नाबाद 61, मॅकग्रा 40, गार्डनर 31, बेल 2-32, इक्लेस्टोन 2-24, ग्लेन 2-33).