ऑस्ट्रेलियाचा 89 धावांनी विजय, इंग्लंडचा कर्दनकाळ ठरलेल्या गार्डनरचे 66 धावात 8 बळी
वृत्तसंस्था /नॉटिंगहॅम
अष्टपैलू अॅश्ले गार्डनरच्या जादुमय फिरकीसमोर इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाला येथे सोमवारी झालेल्या अॅशेस मालिकेतील एकमेव कसोटीत हार पत्करावी लागली. ऑस्ट्रेलियन महिला संघाने हा सामना 89 धावांनी जिंकून या अॅशेस मालिकेत 4 गुणासह आघाडी मिळविली आहे. आता उभय संघामध्ये 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेला एजबॅस्टन येथे 1 जुलैपासून प्रारंभ होणार आहे. 66 धावात 8 गडी बाद करणाऱ्या गार्डनरला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. ट्रेन्ट ब्रिजच्या मैदानावर या एकमेव कसोटीत यजमान इंग्लंडला सोमवारी खेळाच्या पाचव्या दिवशी पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 473 धावा जमविल्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 463 धावा जमविल्याने ऑस्ट्रेलियाला 10 धावांची आघाडी मिळाली.
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात सदरलँडचे दमदार शतक तर इंग्लंडच्या पहिल्या डावात ब्यूमाँटचे द्विशतक ही वैशिष्ट्यो ठरली. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 257 धावा जमवित इंग्लंडला निर्णायक विजयासाठी 268 धावांचे आव्हान दिले. दरम्यान इंग्लंडच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी प्रारंभापासूनच अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. रविवारी खेळाच्या चौथ्या दिवसा अखेर इंग्लंडने आपल्या दुसऱ्या डावात 116 धावात 5 गडी गमाविले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा विजय जवळपास निश्चित झाला होता. इंग्लंडने 5 बाद 116 या धावसंख्येवरुन खेळाला पुढे सुरुवात केली आणि त्यांचे शेवटचे 5 गडी 62 धावांची भर घालत तंबूत परतले. इंग्लंडचा दुसरा डाव 49 षटकात 178 धावात आटोपला. इंग्लंडच्या डावामध्ये डॅनी वॅटने एकाकी लढत देत 88 चेंडूत 5 चौकारांसह 54 धावा जमविल्या. क्रॉसने 1 चौकारासह 13, अॅमी जोन्सने 4, एक्लेस्टोनने 2 चौकारांसह 10 धावा जमविल्या. वॅटला गार्डनरने पायचीत करुन इंग्लंडचा डाव संपुष्टात आणला. ऑस्ट्रेलियाच्या गार्डनरची ही कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी आहे. तिने 66 धावात 8 गडी बाद केले. तर गॅरेथ आणि मॅकग्रा यांनी प्रत्येकी 1 गडी मिळविला. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात लॅम्बने 4 चौकारांसह 28, ब्यूमाँटने 5 चौकारांसह 22 तसेच डंकलेने 2 चौकारांसह 16 धावा केल्या. ऑस्ट्रेलियन महिला संघाने हा विजय उपाहारापर्यंतच्या पहिल्या सत्रातच मिळविला. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघातील या अॅशेस मालिकेमध्ये एकमेव कसोटी, 3 टी-20 सामने तसेच 3 वनडे सामने यांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियन महिला संघाने ही एकमेव कसोटी जिंकून 4 गुण मिळविले आहेत. ऑस्ट्रेलियाने ही एकमेव कसोटी जिंकून अॅशेस स्वत:कडे राखली आहे. आता या अॅशेस मालिकेतील 6 सामने बाकी आहेत. प्रत्येक सामना जिंकल्यास विजयी संघाला 2 गुण मिळतील.
संक्षिप्त धावफलक – ऑस्ट्रेलिया प. डाव 124.2 षटकात सर्व बाद 473, इंग्लंड प. डाव 121.2 षटकात सर्व बाद 463, ऑस्ट्रेलिया दु. डाव 78.5 षटकात सर्व बाद 257, इंग्लंड दु. डाव 49 षटकात सर्व बाद 178 (लॅम्ब 28, ब्यूमाँट 22, नाईट 9, डंकले 16, वॅट 54, क्रॉस 13, जोन्स 4, एक्लेस्टोन 10, बेल नाबाद 1, अवांतर 21, गार्डनर 8-66, गॅरेथ 1-32, मॅकग्रा 1-28).









