नवी दिल्लीत झालेल्या तिसऱ्या वनडेत 781 धावांचा पाऊस : स्मृती मानधनाचे वेगवान शतक वाया
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
स्मृती मानधनाच्या विक्रमी शतकानंतरही भारतीय महिला संघाला तिसऱ्या व निर्णायक वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 43 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियाने विजयासाटी दिलेल्या 413 धावांचा पाठलाग करताना स्मृतीने वनडे क्रिकेटमधील दुसरे वेगवान शतक झळकावले. पण, स्मृती बाद झाल्यानंतर भारतीय संघ 369 धावांत ऑलआऊट झाला आणि कांगारुंनी सामन्यासह मालिकाही 2-1 फरकाने जिंकली. अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या लढतीत तब्बल 781 धावा फटकावल्या गेल्या.
स्मृतीचे वेगवान शतक
कांगारुंनी विजयासाठी दिलेल्या 413 धावांचा पाठलाग करताना स्मृतीने धमाकेदार खेळीचा नजराणा पेश केला. 400 पारच्या लढाईत स्मृती मानधनाने 23 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. भारतीय संघाकडून हे सर्वात जलद अर्धशतक ठरले. एवढ्यावरच न थांबता तिने 50 चेंडूत शतकाला गवसणी घातली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत तिच्या भात्यातून आलेले हे सलग दुसरे शतक आहे. षटकार मारून तिने भारताकडून सर्वात जलद शतक झळाकावले. विशेष म्हणजे, महिला वनडेतील हे दुसरे जलद शतक ठरले. स्मृतीने यावेळी 63 चेंडूंत 17 चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर 125 धावांची दिमाखदार खेळी साकारली. सुरुवातीपासून तिने ऑसी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. शतकानंतर मात्र तिला ग्रेस हॅरिसने बाद केले.
यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने 52 तर दीप्ती शर्माने 72 धावांची वादळी खेळी साकारली. याशिवाय, स्नेह राणाने 35 धावांचे योगदान दिले. पण, ठराविक अंतराने विकेट गमावल्याने भारतीय संघाचा डाव 47 षटकांत 369 धावांत आटोपला. ऑसी संघाने हा सामना 43 धावांनी जिंकत वनडे मालिका 2-1 फरकाने जिंकली.
ऑस्ट्रेलियाचा 400 धावांचा डोंगर
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना 412 धावा केल्या. कर्णधार एलिसा हिलीने 18 चेंडूत 30 धावांची खेळी करत आक्रमक सुरुवात करून दिली. पण, क्रांती गौडने ही विकेट मिळवून दिली. त्यानंतर जॉर्जिया व्हॉल व एलिसा पेरी या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना भारतीय गोलंदाजांना बॅकफूटवर फेकले. जॉर्जिया 68 चेंडूत 14 चौकारासह 81 धावांची खेळी करत स्नेह राणाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाली. ती बाद झाल्यानंतर पेरीने बेथ मुनीसह शतकी भागीदारी करताना संघाला अडीचशेचा टप्पा गाठून दिला.
मुनीचे 57 चेंडूत शतक
पेरीने 72 चेंडूंत 7 चौकार व 2 षटकारांसह 68 धावांची खेळी केली. बेथ मुनीने जलद फलंदाजी करत फक्त 57 चेंडूत शतक पूर्ण केले. महिला एकदिवसीय सामन्यांमधील हे दुसरे सर्वात जलद शतक ठरले. पेरी आणि मुनी या दोघी बाद झाल्यानंतर अॅश्ले गार्डनरनेही 39 धावांची आक्रमक खेळी केली. गार्डनर बाद झाल्यानंतर मात्र ऑसी संघाने शेवटच्या चार विकेट 33 धावांत गमावल्या. ऑस्ट्रेलियन संघ 47.5 षटकांत 412 धावांत ऑलआऊट झाला.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलियन महिला संघ 47.5 षटकांत सर्वबाद 412 (जॉर्जिया व्हॉल 81, एलिस पेरी 68, बेथ मुनी 75 चेंडूत 23 चौकार आणि 1 षटकारासह 138, अॅश्ले गार्डनर 39, अरुंधती रे•ाr 3 बळी, रेणुका सिंग आणि दीप्ती शर्मा प्रत्येकी 2 बळी)
भारतीय महिला संघ 47 षटकांत सर्वबाद 369 (स्मृती मानधना 63 चेंडूत 17 चौकार आणि 5 षटकारासह 125, दीप्ती शर्मा 72, स्नेह राणा 35, हरमनप्रीत कौर 52, राधा यादव 18, किम गर्थ 3 बळी, मेगन स्कट 2 बळी).
भारताविरुद्ध पहिल्यांदाच 400 धावा
महिलांच्या वनडेमध्ये भारताविरुद्ध पहिल्यांदाच 400 धावांचा टप्पा गाठण्यात आला. शनिवारी झालेल्या भारताविरुद्ध तिसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलिया महिला संघाने 412 धावा केल्या. यापूर्वी, ऑस्ट्रेलियाने 2004 मध्ये भारताविरुद्ध 371 धावा करून सर्वाधिक एकदिवसीय धावसंख्या नोंदवली होती. विशेष म्हणजे, महिला क्रिकेटमध्ये 400 धावांचा टप्पा ओलांडण्याची ही केवळ सातवी वेळ आहे. ऑस्ट्रेलिया महिला संघाने दुसऱ्यांदा वनडेत 400 धावांचा टप्पा ओलांडला. 1997 मध्ये डेन्मार्कविरुद्धही संघाने 412 धावा केल्या. महिला क्रिकेटमध्ये न्यूझीलंडने चार वेळा 400 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
स्मृतीचे वनडे क्रिकेटमधील दुसरे जलद शतक
शनिवारी झालेल्या लढतीत स्मृती मानधनाने आपल्या वनडे कारकिर्दीतील 14 वे शतक साजरे केले. तिने 63 चेंडूत 125 धावांची खेळी साकारली. यादरम्यान तिने 50 चेंडूत शतक पूर्ण केले आणि एकदिवसीय सामन्यात (पुरुष आणि महिला) सर्वात जलद शतक करणारी भारतीय फलंदाज बनली. तिने या बाबतीत विराट कोहलीचा विक्रम मोडला. विराटने 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 52 चेंडूत शतक ठोकले होते. याशिवाय, महिला एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारी दुसरी सर्वात जलद फलंदाज बनली. महिलांच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जलद शतकाचा विक्रम माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅनिंगच्या नावावर आहे.
महिलांच्या वनडे सामन्यांमध्ये सर्वात जलद शतके (चेंडूंच्या आधारे)
45 – मेग लॅनिंग वि न्यूझीलंड- 2012
50 – स्मृती मानधना वि ऑस्ट्रेलिया 2025
57- करेन रोल्टन वि दक्षिण आफ्रिका 2000
57 – बेथ मूनी वि भारत 2025









