लंकेचा पाच गड्यांनी पराभव : मार्श, इंग्लिस यांची अर्धशतके, सामनावीर झाम्पाचे चार बळी
वृत्तसंस्था/ लखनौ
2023 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सोमवारी येथे खेळविण्यात आलेल्या 14 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने लंकेचा 5 गड्यांनी पराभव करत आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. मात्र लंकेची पराभवाची मालिका या सामन्यातही खंडित झाली नाही. या स्पर्धेतील लंकेचा हा तिसरा पराभव असून त्यांना गुणतक्त्यात आपले खाते उघडता आलेले नाही. सोमवारच्या सामन्यात निसांका आणि कुसल परेरा यांची अर्धशतके तसेच त्यांनी नोंदवलेली शतकी भागीदारी वाया गेली. ऑस्ट्रेलियातर्फे मार्श आणि इंग्लिस यांनी अर्धशतके झळकाविली. ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेतील गुणतक्त्यात आपले खाते उघडले असून त्यांनी तीन सामन्यातून दोन गुण मिळवले आहेत. अॅडम झाम्पाला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात लंकेचा कर्णधार कुसल मेंडीसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ढगाळ वातावरणात तसेच ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीसमोर लंकेने आपल्या डावाला दमदार सुरूवात केली. निसांका आणि कुसल परेरा या जोडीने सावध फलंदाजी करत 21.4 षटकात 125 धावांची शतकी भागीदारी केली. यावेळी लंकेचा संघ किमान 270 धावांपर्यंत मजल मारेल असे वाट होते. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर लंकेने आपले शेवटचे 9 गडी 84 धावात गमाविल्याने लंकेचा डाव 43.3 षटकात 209 धावात आटोपला.
लंकेची सलामीची जोडी निसांका आणि परेरा यांनी पहिल्या पॉवरप्लेच्या 10 षटकात 51 धावा जमविल्या. लंकेचे पहिले अर्धशतक तसेच अर्धशतकी भागीदारी 55 चेंडूत नोंदविली गेली. लंकेचे शतक 106 चेंडूत फलकावर लागले. निशांका आणि कुसल परेरा यांची शतकी भागीदारी ही 106 चेंडूत नोंदविली गेली. त्यामध्ये निसांकाचा वाटा 47 तर कुसल परेराचा वाटा 45 धावांचा होता. परेराने 57 चेंडूत 8 चौकारांसह अर्धशतक झळकाविले. तर निसांकाने आपले अर्धशतक 58 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. 22 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर कमिन्सने निसांकाला वॉर्नरकरवी झेलबाद केले. त्याने 67 चेंडूत 8 चौकारांसह 61 धावा जमविताना परेरा समवेत 125 धावांची भागीदारी केली. तो बाद झाल्यानंतर परेरा अधिक वेळ टिकू शकला नाही. कमिन्सने कुसल परेराचा 27 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर त्रिफळा उडविला. त्याने 82 चेंडूत 12 चौकारांसह 78 धावा केल्या. लंकेची यावेळी स्थिती 26.2 षटकात 2 बाद 157 अशी होती. लंकेचे दीडशतक 147 चेंडूत फलकावर लागले.
ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज अॅडम झाम्पा हा प्रभावी ठरला. लंकेचे फलंदाज चुकीचे फटके मारण्याच्या नादात झटपट बाद झाले. डावातील 28 व्या षटकात झाम्पाने कर्णधार कुसल मेंडीसला वॉर्नरकरवी झेलबाद केले. त्याने 9 धावा जमविल्या. यानंतर झाम्पाने समरविक्रमाला 8 धावावर पायचीत केले. लंकेची स्थिती 32.1 षटकात 4 बाद 178 असताना किरकोळ पावसाच्या सरी आल्याने खेळ थांबवावा लागला होता. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा खेळाला प्रारंभ झाला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी या वातावरणाचा पुरेपूर फायदा घेतला. धनंजय डिसिल्वाला स्टार्कने 7 धावावर त्रिफळाचीत केले. वेलालगे कमिन्सच्या अचूक फेकीवर 2 धावावर धावचीत झाला. झाम्पाने करूणारत्नेला 2 धावावर पायचीत केले. तर त्यानंतर त्याने महेश थीक्षनाला खाते उघडण्यापूर्वीच पायचीत केले. स्टार्कने कुमाराचा 4 धावावर त्रिफळा उडविला. एका बाजूने डाव सावरण्याचा प्रयत्न करणारा असालंका मॅक्सवेलचा बळी ठरला. तो शेवटच्या गड्याच्या रुपात बाद झाला. मॅक्सवेलच्या चेंडूवर असालंका लाबुशेनकरवी झेलबाद झाला. त्याने 39 चेंडूत 1 षटकारासह 25 धावा जमविल्या. लंकेचा डाव 43.3 षटकात 209 धावात आटोपला. लंकेच्या डावात 1 षटकार आणि 23 चौकार नोंदविले गेले. लंकेने दुसऱ्या पॉवरप्ले दरम्यान 148 धावात 8 गडी गमविले. तर शेवटच्या 10 षटकातील तिसऱ्या पॉवरप्लेमध्ये त्यांनी 10 धावा जमविताना 2 गडी गमविले. ऑस्ट्रेलियातर्फे झाम्पाने 47 धावात 4 तर स्टार्क आणि कमिन्स यांनी प्रत्येकी 2 तसेच मॅक्सवेलने 1 गडी बाद केला.
डावाला डळमळीत सुरुवात
ऑस्ट्रेलियाच्या डावाला डळमळीत सुरुवात झाली. सलामीचा मिचेल मार्श आणि डेव्हीड वॉर्नर यांनी 19 चेंडूत 24 धावांची भर घातली. पण डावातील चौथ्या षटकात मधूशंकाने ऑस्ट्रेलियाला पाठोपाठ 2 धक्के दिले. या षटकातील पहिल्याच चेंडूवर मधूशंकाने वॉर्नरला पायचीत केले. त्याने 6 चेंडूत 1 चौकारांसह 11 धावा जमविल्या. मधूशंकाने आपल्या या षटकातील शेवटच्या चेंडूवर स्टिव्ह स्मिथला खाते उघडण्यापूर्वीच पायचीत केले. ऑस्ट्रेलियाची यावेळी स्थिती 4 षटकात 2 बाद 24 अशी होती. ऑस्ट्रेलियाने पहिल्या पॉवरप्लेच्या 10 षटकात 64 धावा जमविताना 2 गडी गमविले. ऑस्ट्रेलियाचे पहिले अर्धशतक 48 चेंडूत फलकावर लागले. मार्श आणि लाबूशेन यांनी संघाचा डाव बऱ्यापैकी सावरला. मार्शने 39 चेंडूत 9 चौकारांसह अर्धशतक झळकाविले. मार्श आणि लाबूशेन यांनी तिसऱ्या गड्यासाठी 57 धावांची भागीदारी केली. 15 व्या षटकात मार्श एकेरी धाव घेण्याच्या नादात धावचीत झाला. मार्शने 51 चेंडूत 9 चौकारांसह 52 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाने यावेळी 14.3 षटकात 3 बाद 81 धावांपर्यंत मजल मारली होती. ऑस्ट्रेलियाचे शतक 107 चेंडूत फलकावर लागले.
लाबूशेन आणि इंग्लिस यांनी चौथ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी 60 चेंडूत नोंदविली. तर ऑस्ट्रेलियाचे दीडशतक 161 चेंडूत फलकावर लागले. इंग्लिशने फटकेबाजी करत आपले अर्धशतक 46 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. लाबूशेन आणि इंग्लिस यांनी चौथ्या गड्यासाठी 77 धावांची भागीदारी केली. डावातील 29 व्या षटकात मधूशंकाने लाबूशेनला करुणारत्नेकरवी झेलबाद केले. त्याने 60 चेंडूत 2 चौकारांसह 40 धावा जमविल्या. वेलालगेने आपल्या दुसऱ्या हप्त्यातील गोलंदाजीत इंग्लिसला थीक्षनाकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने 59 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 58 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाची यावेळी स्थिती 33.1 षटकात 5 बाद 192 अशी होती. ऑस्ट्रेलियाला यावेळी विजयासाठी 18 धावांची गरज होती. मॅक्सवेल आणि स्टोईनिस यांनी विजयाचे सोपस्कार 36 व्या षटकात पूर्ण केले. मॅक्सवेलने 21 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 31 तर स्टोईनिसने 10 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 20 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाचे द्विशतक 204 चेंडूत नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियाच्या डावात 5 षटकार आणि 22 चौकार नोंदविले गेले. मधूशंकाने 38 धावात 3 तर वेलालगेने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : लंका 43.3 षटकात सर्व बाद 209 (निसांका 67 चेंडूत 8 चौकारांसह 61, कुसल परेरा 82 चेंडूत 12 चौकारांसह 78, असालंका 39 चेंडूत 1 षटकारासह 25, कुसल मेंडीस 9, समरविक्रमा 8, अवांतर 13, झाम्पा 4-47, स्टार्क 2-43, कमिन्स 2-32, मॅक्सवेल 1-36).
ऑस्ट्रेलिया 35.2 षटकात 5 बाद 215 (मार्श 51 चेंडूत 9 चौकारांसह 51, वॉर्नर 6 चेंडूत 1 षटकारासह 11, स्मिथ 0, लाबूशेन 60 चेंडूत 2 चौकारांसह 40, इंग्लिस 59 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 58, मॅक्सवेल 21 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 31, स्टोईनिस 10 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 20, अवांतर 3, मधूशंका 3-38, वेलालगे 1-53).









