लाहोर/ वृत्तसंस्था
19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आयसीसीच्या चॅम्पियन्स करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्त्वाखाली ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे सोमवारी येथे आगमन झाले. 2025 च्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेल बुधवारपासून कराचीत प्रारंभ होत आहे. यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात सलामीचा सामना होईल. यजमान पाकचा संघ हा या स्पर्धेतील विद्यमान विजेता आहे. ब्रिटनमध्ये 2017 साली झालेल्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत पाकने अंतिम सामन्यात भारताचा पराभव करून विजेतेपद मिळविले होते. ऑस्ट्रेलियन संघाचा या स्पर्धेतील सलामीचा सामना 22 फेब्रुवारी रोजी इंग्लंडबरोबर गदाफी स्टेडियममध्ये खेळविला जाणार आहे.
सोमवारी लाहोरच्या विमानतळावर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघातील खेळाडू दोन गटामध्ये दाखल झाले. पहिल्या गटामध्ये कर्णधार स्टीव्ह स्मिथ तसेच प्रशिक्षक वर्गाचा समावेश होता. हा पहिला गट कोलंबोतून व्हाया दुबईमार्गे लाहोरमध्ये दाखल झाला. तर दुसऱ्या गटामध्ये 15 खेळाडू तसेच प्रशिक्षक वर्गातील दोन सदस्यांचा समावेश होता. या स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियन संघ सरावाचे सामने खेळणार नाही. ऑस्ट्रेलियाचा या स्पर्धेतल दुसरा सामना 25 फेब्रुवारीला रावळपिंडीत तर तिसरा सामना अफगाणबरोबर 28 फेब्रुवारीला गदाफी स्टेडियममध्ये होणार आहे.









