पॅट कमिन्सकडे नेतृत्वाची धुरा : मिचेल स्टार्क, स्टीव्ह स्मिथचे पुनरागमन
वृत्तसंस्था/ सिडनी
विश्वचषकाआधी भारतात होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने रविवारी संघाची घोषणा केली. पॅट कमिन्सकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली असून स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेलचे ऑस्ट्रेलियाच्या संघात पुनरागमन झाले आहे. विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला तयारीची चाचपणी करण्याच्या उद्देशाने मैदानावर उतरेल. उभय संघातील पहिला वनडे सामना दि. 22 रोजी मोहाली येथे होणार आहे.
अॅशेस मालिकेत दुखापत झाल्यामुळे ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स दक्षिण आफ्रिकेतील वनडे मालिकेत भाग घेऊ शकला नाही. याशिवाय स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल हे देखील दुखापतींमुळे या मालिकेत सहभागी झाले नव्हते. आता हे तिन्ही खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त असून टीम इंडियाविरुद्ध मालिकेत पुनरागमन करणार आहेत. भारतीय खेळपट्ट्या लक्षात घेऊन ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात दोन फिरकी गोलंदाजांचाही समावेश केला आहे. अॅडम झम्पा आणि तनवीर संघा यांना संघात स्थान मिळाले आहे. याशिवाय ग्लेन मॅक्सवेल हा संघाचा तिसरा फिरकी गोलंदाजही पर्याय म्हणून असेल. याशिवाय, आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेत चमकदार कामगिरी करणाऱ्या मार्नस लाबुशेनची देखील संघात वर्णी लागली आहे. तसेच मिचेल स्टार्कशिवाय कर्णधार पॅट कमिन्स, शॉन अॅबॉट, जोस हॅजलवूड आणि स्पेन्सर जॉन्सन यांच्यावर वेगवान गोलंदाजीची धुरा असेल.
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या वनडे मालिकेचा विचार केला, तर पहिला सामना 22 सप्टेंबर रोजी मोहालीमध्ये खेळला जाईल. दुसरा सामना 24 सप्टेंबर रोजी इंदोरमध्ये, तर तिसरा सामना 27 सप्टेंबर रोजी राजकोटमध्ये पार पडेल. आगामी वनडे विश्वचषक 5 ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे. वनडे विश्वचषकापूर्वी दोन्ही संघांच्या सरावासाठी ही वनडे मालिका महत्वाची ठरेल.
ऑस्ट्रेलिया संघ – पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोस हॅजलवूड, जोश इंग्लिश, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लाबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा.









