वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅश्टन अॅगर याला देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आलेल्या कसोटी संघातून मुक्त करण्यात आले असून तो मायदेशी परतला असल्याचे राष्ट्रीय निवड समितीच्या टोनी डोडेमेड यांनी बुधवारी सांगितले. अॅगर देशांतर्गत हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात पश्चिम ऑस्ट्रेलियाकडून खेळणार आहे. सदर 29 वषीय डावखुरा फिरकीपटू हा दौऱ्याच्या मध्यास मायदेशी परतणारा ताजा खेळाडू बनला आहे. पाहुण्यांनी चार सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी लढती गमावल्या आहेत.
अॅगरने कठोर परिश्र्रम केले आहेत. त्याने संघाला आधार देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्याने केलेल्या प्रयत्नांची आम्ही दखल घेतली आहे. पण पहिल्या कसोटीत आम्ही कोणत्या फिरकी समीकरणासह उतरायचे हे ठरविणे खूप कठीण होते. शिवाय दोन ऑफस्पिनर एकत्र खेळणे योग्य ठरेल की नाही यावर प्रश्नचिन्ह होते. आम्ही मॅथ्यू कुहनमनसह दुसऱ्या कसोटीत उतरलो. तो निर्णयही कठीण होता. मॅथ्यूची शैली तेथील परिस्थितीत उपयुक्त ठरेल असे वाटल्याने आम्ही तो निर्णय घेतला’, असे डोडेमेड यांनी सांगितले.
अॅगर कोणताही सामना न खेळता मायदेशी परतला आहे. नागपुरातील पहिल्या कसोटीसाठी ऑफस्पिनर टॉड मर्फीची त्याच्याऐवजी निवड करण्यात आली, तर दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने तीन फिरकीपटू निवडले असले, तरी अॅगरला संधी न मिळता डावखुरा फिरकीपटू मॅथ्यू कुहनमनने पदार्पण केले. 2013 मध्ये पदार्पण केल्यापासून अॅगर फक्त पाच कसोटी खेळला आहे. मात्र अलीकडच्या वर्षांत तो एकदिवसीय सामन्यांतील आघाडीचा गोलंदाज बनला आहे.
बॉर्डर-गावसकर चषक मालिकेची तिसरी कसोटी इंदूरमध्ये 1 मार्चपासून सुरू होणार असून अंतिम सामना 9 मार्चपासून अहमदाबादमध्ये खेळवला जाईल. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड हे दुखापतींमुळे मायदेशी परतले आहेत. अॅगर 2 मार्च रोजी पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या पुढील शेफिल्ड शिल्ड सामन्यात आणि 8 मार्च रोजी 50 षटकांच्या मार्श कप स्पर्धेच्या अंतिम सान्यात खेळणार आहे. आपल्या मुलाच्या जन्मामुळे दिल्लीतील दुसऱ्या कसोटीपूर्वी मायदेशी परतलेला लेगस्पिनर मिशेल स्वेप्सन आणि कौटुंबिक कारणास्तव मायदेशी परतलेला कर्णधार पॅट कमिन्स हे इंदूरच्या सामन्यापूर्वी दौऱ्यावरील संघात सामील होणार आहेत.









