सिंधू, श्रीकांतकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा
वृत्तसंस्था / सिडनी
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या बॅडमिंटन टूरवरील येथे मंगळवारपासून 420,000 अमेरिकन डॉलर्स एकूण बक्षीस रकेमच्या पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत भारताचे अव्वल बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि किदांबी श्रीकांत यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
सदर स्पर्धा सुपर 500 दर्जाची असून आगामी डेन्मार्क येथे होणाऱ्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेपूर्वीची ऑस्ट्रेलियातील ही स्पर्धा सिंधू आणि श्रीकांत यांच्या दृष्टीने सुर मिळविण्यासाठी महत्वाची आहे, यासाठी ही त्यांची शेवटची संधी आहे. 2023 च्या बॅडमिंटन हंगामात सिंधू आणि श्रीकांत यांच्याकडून फारशी चांगली कामगिरी झालेली नाही. 2019 साली विश्व चॅम्पियनशिप मिळविणाऱ्या सिंधूला गेल्या काही महिन्यापासून वारंवार दुखापतीने दमवले आहे. त्यामुळे या वर्षीच्या बॅडमिंटन हंगामातील विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या 12 पैकी 7 स्पर्धांमध्ये सिंधूला लवकर बाद व्हावे लागले. पी. व्ही. सिंधूला साईचे प्रशिक्षक विधी चौधरी यांचे मार्गदर्शन लाभत होते. आता त्यांच्या जागी 2003 सालचे अखिल इंग्लंड चॅम्पियन मोहम्मद हाफिज हशिम हे नवे प्रशिक्षक लाभणार आहेत. मंगळवारपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत सिंधूचा सलामीचा सामना भारताच्या अस्मिता चलीहाशी होणार आहे.
पुरूष विभागात भारताच्या किदांबी श्रीकांत या वर्षीच्या बॅडमिंटन हंगामात फारशी समाधानकारक कामगिरी करू शकला नाही. नुकत्याच झालेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत त्याने तैपईच्या चेनचा पराभव केला. पण त्याला या स्पर्धेत प्रणॉयकडून हार पत्कारावी लागली. ऑस्ट्रेलियन बॅडमिंटन स्पर्धेत किदांबीचा सलामीचा सामना जपानच्या निशीमोटोशी होणार आहे. भारताच्या एच. एस. प्रणॉय, लक्ष्य सेन, सात्वीक साईराज व चिराग शेट्टी यांच्याकडून दर्जेदार कामगिरी झाल्याचे दिसून येते.
पुरूष दुहेरीत सात्विक आणि चिराग या जोडीने यावर्षी चार स्पर्धा जिंकल्या आहेत. पण ही जोडी ऑस्ट्रेलियन बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होणार नाही. 21 ते 27 ऑगस्ट दरम्यान डेन्मार्कमध्ये होणाऱ्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी त्यानी आपल्या जोरदार सरावावर भर देण्याचे ठरविले आहे. एकेरीमध्ये सध्या प्रणॉय आणि सेन यांच्यात कामगिरीत निश्चितच सातत्य दिसत आहे. मानांकणात प्रणॉय दहाव्या स्थानावर असून त्याने मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा जिंकल्या असून अन्य तीन स्पर्धांमध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली आहे. जपान बॅडमिंटन स्पर्धेत त्याला उपांत्यफेरीत डेन्मार्कच्या टॉप सिडेड अॅक्सेलसेनकडून पराभव पत्करावा लागला होता. तसेच गेल्या आठवड्यात त्याने हाँगकाँगच्या ली चा पराभव केला होता. ऑस्ट्रेलियन बॅडमिंटन स्पर्धेत प्रणॉयचा सलामीचा सामना चीनच्या झूबरोबर होणार आहे. महिला विभागात आकर्षी काश्यप तसेच मालविका बनसोड भारताचे प्रतिनिधीत्व करतील.