वृत्तसंस्था/जोहोर (मलेशिया)
सुलतान जोहोर चषक हॉकी स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया पुरुष हॉकी संघाने भारताचा 4-2 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात भारतातर्फे कर्णधार रोहितने 22 व्या मिनिटाला तर अर्शदीप सिंगने 60 व्या मिनिटाला गोल केले. ऑस्ट्रेलियातर्फे ऑस्कर स्प्रोलीने 39 आणि 42 व्या मिनिटाला असे दोन गोल नोंदविले. अँड्रीव्ह पॅट्रीक 40 व्या तर कर्णधार डायलेन डाऊनीने 51 व्या मिनिटाला गोल केले. आता या स्पर्धेत भारतीय संघ आपल्या गटातून गुणतक्त्यात चार सामन्यातून 7 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
भारतीय हॉकी संघाने आतापर्यंत दोन सामने जिंकले असून एक सामना अनिर्णीत राखला तर एक सामना गमविला. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघ चार सामन्यातून 10 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील झालेल्या लढतीमध्ये पहिला 15 मिनिटांचा कालावधी दोन्ही संघांनी आक्रमक आणि वेगवान खेळावर अधिक भर दिला होता. पण दोन्ही संघांना या कालावधीत आपले खाते उघडता आले नाही. सामन्यातील दुसऱ्या 15 मिनिटांच्या कालावधीत भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. 17 व्या मिनिटाला मिळालेल्या या पेनल्टी कॉर्नरवर अनमोल एक्काचा फटका गोलपोस्टच्या वरुन बाहेर गेल्याने ही संधी वाया गेली.









