अल्कारेझ-सिनेर, साबालेंका-गॉफ यांच्यात जेतेपदासाठी चुरस अपेक्षित
वृत्तसंस्था/ मेलबोर्न
2025 च्या टेनिस हंगामातील पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेला येथे रविवारपासून प्रारंभ होत आहे. इटलीचा जेनिक सिनेर आणि आर्यना साबालेंका हे या स्पर्धेतील विद्यमान विजेते आहेत. पुरुष विभागात पुन्हा एकदा सिनेर आणि स्पेनचा अल्कारेझ यांच्यातील टेनिस द्वंद पहावयास मिळणार आहे.
या स्पर्धेसाठी स्पेनच्या अल्कारेझने गेल्या दोन दिवसांपासून टेनिसचा चांगला सराव केला आहे. आतापर्यंत त्याने चार ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. इटलीचा सिनेर पुन्हा यावेळी जेतेपद राखण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करणार असल्याने तोच खरा अल्कारेझचा प्रतिस्पर्धी राहिल. 21 वर्षीय अल्कारेझ आणि 23 वर्षिय सिनेर 2025 च्या टेनिस हंगामात पुन्हा दर्जेदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. स्वीसचा रॉजर फेडरर आणि स्पेनचा राफेल नदाल यांनी टेनिस क्षेत्रातून निवृत्ती पत्करल्यानंतर आता सर्बियाच्या माजी टॉप सिडेड जोकोविचला सिनेर आणि अल्कारेझ यांच्या आव्हानाला तोंड द्यावे लागत आहे. जोकोविचने आतापर्यंत आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत 24 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविण्याचा पराक्रम केला आहे. सिनेरला या स्पर्धेत पुरुष एकेरीत टॉप सिडींग देण्यात आली असून जर्मनीचा अॅलेक्सझांडेर व्हेरेव्ह हा सिडींगमध्ये दुसऱ्या स्थानावर असून अल्कारेझ तिसऱ्या स्थानावर आहे. सिनेर आणि अल्कारेझ यांनी गेल्या वर्षी दोन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. जागतिक टेनिस क्षेत्रात वर्तमान काळात सिनेर आणि अल्कारेझ हे सर्वोत्तम टेनिसपटू म्हणून ओळखले जातात. सिनेरने गेल्या सप्टेंबरमध्ये अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकली होती. स्पेनच्या अल्कारेझला गेल्या वर्षी या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात व्हेरेव्हने पराभूत केले होते. पण त्यानंतर अल्कारेझने फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेत अंतिम फेरीत व्हेरेव्हचा पराभव करत विजेतेपद पटकाविले होते. तर गेल्या वर्षी अल्कारेझने विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेत अनुभवी जोकोविचचा सलग दुसऱ्या वर्षी पराभव करत अजिंक्यपद पटकाविले होते.
जर्मनीच्या व्हेरेव्हचा सलामीचा सामना वाईल्ड कार्डधारक लुकास पौलीशी होणार आहे. तर महिला एकेरीमध्ये विद्यमान विजेती साबालेंकाचा सलामीची लढत 2017 साली अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकणाऱ्या स्लोनी स्टिफेन्सशी होणार आहे. झेंग क्विनवेन आणि कास्पर रुड यांच्यातही सलामीची लढत होईल. अल्कारेझ, सिनेर, जोकोविच, पोलंडची इगा स्वायटेक आणि अमेरिकेची कोको गॉफ यांचे सलामीचे सामने सोमवारी होतील. अल्कारेझ आणि सिनेर यांच्यात आतापर्यंत 10 सामने झाले असून त्यापैकी 6 सामने अल्कारेझने तर 4 सामने सिनेरने जिंकले आहेत.









