वृत्तसंस्था/ होबार्ट
ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या शेफिल्ड शिल्ड स्पर्धेतील व्हिक्टोरिया आणि टास्मानिया यांच्यातील सामन्यात खेळताना व्हिक्टोरिया संघातील फलंदाज विल पुकोवेस्कीला गंभीर दुखापत झाली आहे.
टास्मानिया संघातील वेगवान गोलंदाज रिले मेर्डिथचा उसळता चेंडू पुकोवेस्कीच्या हेल्मेटवर आदळला. 26 वर्षीय पुकोवेस्कीच्या डोक्याला इजा झाल्याने त्याला वेदना सुरू झाल्या. हेल्मेटच्या डाव्या बाजूवर हा चेंडू आदळला आणि काही क्षणात पुकोवेस्की मैदानात कोसळला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला पुकोवेस्की दुखापतीमुळे निवृत्त झाला आणि त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. त्याच्या दुखापतीचे स्कॅनिंग करण्यात येणार असून त्यानंतरच या दुखापतीची स्थिती समजू शकेल, असे क्रिकेट व्हिक्टोरियाच्या प्रवक्त्याने सांगितले. या स्पर्धेतील यापूर्वीच्या झालेल्या सामन्यात पुकोवेस्कीने न्यू साऊथ वेल्स संघा विरुद्ध शानदार शतक (131) झळकवले होते. जानेवारी 2021 रोजी पुकोवेस्कीने भारता विरुद्ध एकमेव कसोटी खेळली होती.









