सामनावीर उस्मान ख्वाजाचे अर्धशतक, नाबाद 44 धावा करणारा कमिन्स ठरला हिरो, ब्रॉडचे 3 बळी
वृत्तसंस्था/ बर्मिंगहॅम
रोमांचक ठरलेल्या अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर केवळ 2 गड्यांनी निसटता विजय मिळवित पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळविली. पहिल्या डावात शतक व दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी करणाऱ्या उस्मान ख्वाजाला सामनावीराचा बहुमान मिळाला. मात्र ऑस्ट्रेलियन विजयाचा हिरो ठरला तो कर्णधार पॅट कमिन्स. त्याने अतिशय संयमी खेळ करीत नाबाद 44 धावा जमवित संघाला विजय मिळवून दिला.
उपाहारानंतरच्या सत्रात बोलँड (20) व ट्रॅव्हिस हेड (24 चेंडूत 16) लवकर बाद झाल्यानंतर उस्मान ख्वाजा व ग्रीन यांनी सावध फलंदाजी करीत 49 धावांची भर घातली. ग्रीनला रॉबिन्सनने त्रिफळाचीत करीत ही जोडी फोडली. ग्रीनने 66 चेंडूत 28 धावा केल्या. नंतर चिवट फलंदाजी करणाऱ्या ख्वाजाला कर्णधार स्टोक्सने त्रिफळाचीत करीत मुख्य अडथळा दूर केला. कडवा प्रतिकार करणाऱ्या ख्वाजाने 197 चेंडूत 7 चौकारांसह 65 धावा केल्या. पॅरे व कमिन्स यांनी 18 धावांची भर घातल्यानंतर पॅरेला रूटने स्वत:च्याच गोलंदाजीवर झेलबाद केले.
कमिन्सला नंतर लियॉनकडून चांगली साथ मिळाली आणि दोघांनी मिळून नवव्या गड्यासाठी अभेद्य 55 धावांची भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला. 92.3 षटकांत ऑस्ट्रेलियाने 8 बाद 282 धावा जमविल्या. विजयी चौकार मारणाऱ्या कमिन्सने 73 चेंडूत 4 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 44 धावा काढल्या तर लियॉन 28 चेंडूत 16 धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडच्या ब्रॉडने 64 धावांत 3, रॉबिन्सनने 2, मोईन अली, रूट, स्टोक्स यांनी एकेक बळी मिळविला.
या मालिकेतील दुसरी कसोटी 28 जूनपासून लॉर्ड्स मैदानावर होणार आहे.
तत्पूर्वी, या सामन्यात इंग्लंडने आपला पहिला डाव 8 बाद 393 धावांवर घोषित केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 386 धावा जमविल्या. इंग्लंडला 7 धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर इंग्लंडचा दुसरा डाव 66.2 षटकात 273 धावात आटोपला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला निर्णायक विजयासाठी 281 धावांचे आव्हान मिळाले. सोमवारी या सामन्यातील चौथ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 30 षटकात 3 बाद 107 धावा जमविल्या होत्या. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात शानदार शतक झळकाविणारा उस्मान ख्वाजाने पुन्हा दुसऱ्या डावात चिवट फलंदाजी करत अर्धशतक झळकाविले.

मंगळवारी खेळाच्या शेवटच्या सत्राला पावसामुळे उशिरा प्रारंभ झाला. उपाहारापर्यंतचा खेळ वाया गेला. पंचांनी खेळपट्टी आणि मैदानाची पाहणी केल्यानंतर खेळाच्या दुसऱ्या सत्राला प्रारंभ झाला. या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये ऑस्ट्रेलियाने 76 धावांची भर घालताना 2 गडी गमाविले. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना फटकेबाजीपासून रोखले होते.

दरम्यान, नाईट वॉचमन म्हणून मैदानात आलेला बोलँड ब्रॉडच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक बेअरस्टोकरवी झेलबाद झाला. त्याने 40 चेंडूत 2 चौकारांसह 20 धावा जमविल्या. बोलँड बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या हेडने ख्वाजाला बऱ्यापैकी साथ दिली. या जोडीने 5 व्या गड्यासाठी 22 धावांची भर घातली. दरम्यान, मोईन अलीच्या फिरकीवर हेड रुटकरवी झेलबाद झाला. त्याने 24 चेंडूत 3 चौकारांसह 16 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाने यावेळी 5 बाद 143 धावांपर्यंत मजल मारली होती. उस्मान ख्वॉजाने ग्रीनसमवेत 6 व्या गड्यासाठी चहापानापर्यंत अभेद्य 40 धावांची भर घातली. ख्वाजाने आपले अर्धशतक पूर्ण केले. चहापानावेळी ख्वॉजा 7 चौकारांसह 56 तर ग्रीन 2 चौकारांसह 22 धावांवर खेळत होते. इंग्लंडतर्फे ब्रॉडने 42 धावात 3 तर रॉबिन्सन आणि मोईन अली यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला होता.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड प. डाव : 78 षटकात 8 बाद 393 डाव घोषित, ऑस्ट्रेलिया प. डाव 116.1 षटकात सर्व बाद 386, इंग्लंड दु. डाव 66.2 षटकात सर्व बाद 273, ऑस्ट्रेलिया दु. डाव (2.3 षटकात 8 बाद 282 (ख्वाजा 7 चौकारांसह 65, वॉर्नर 36, लाबुशेन 13, स्टीव्ह स्मिथ 6, बोलँड 20, हेड 16, पॅमेरॉन ग्रीन 2 चौकारांसह 28, पॅरे 2 चौकारांसह 20, कमिन्स 73 चेंडूत 4 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 44, लियॉन 28 चेंडूत नाबाद 16, अवांतर 18, ब्रॉड 3-64, रॉबिन्सन 2-43, मोईन अली 1-57, स्टोक्स 1-9, रूट 1-43.









