तीन सामन्यांची वनडे मालिका, झेवियर बार्टलेट सामनावीर
वृत्तसंस्था/ मेलबर्न
कर्णधार स्टिव्ह स्मिथ, कॅमेरॉन ग्रीन आणि जोश इंग्लिश यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर शुक्रवारी येथे खेळविण्यात आलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दिवस-रात्रीच्या पहिल्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने विंडीजचा आठ गड्यांनी दणदणीत पराभव करून विजयी सलामी दिली. या सामन्यात झेवियर बार्टलेटला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. ऑस्ट्रेलियाच्या बार्टलेटने 17 धावात 4 गडी बाद केले.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजी दिली. विंडीजचा डाव 48.4 षटकात 231 धावात आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 38.3 षटकात 2 बाद 232 धावा जमवत हा सामना 69 चेंडू बाकी ठेवून जिंकला.
विंडीजच्या डावात केसी कार्टीने 108 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारासह 88 तर रॉस्टन चेसने 67 चेंडूत 7 चौकारासह 59, हेडन वॉल्शने 20, फोर्डने 1 षटकार आणि 1 चौकारासह 19, कर्णधार शाय होपने 1 चौकारासह 12, हॉजने 1 चौकारासह 11 धावा जमवल्या. ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीसमोर विंडीजची एकवेळ स्थिती 4 बाद 59 अशी केविलवाणी झाली होती. त्यानंतर कार्टी आणि चेस यांनी पाचव्या गड्यासाठी 110 धावांची भागीदारी केल्याने विंडीजला 231 धावापर्यंत मजल मारता आली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी दर्जेदार झाली. विंडीजच्या डावात 3 षटकार आणि 17 चौकार नोंदवले गेले. ऑस्ट्रेलियातर्फे झेवियर बार्टलेटने 17 धावात 4 तर अॅबॉट आणि ग्रीन यांनी प्रत्येकी दोन तर झाम्पाने एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाच्या डावाला डळमळीत सुरुवात झाली. पहिल्याच षटकातील पाचव्या चेंडूवर विंडीजच्या फोर्डने हेडला 4 धावावर झेलबाद केले. त्यानंतर विंडीजची गोलंदाजी प्रभावी झाली नाही. इंग्लिश आणि ग्रीन या जाडीने दुसऱ्या गड्यासाठी 79 धावांची भागीदारी केली. 12 व्या षटकात विंडीजच्या गुडाकेश मोतीने इंग्लिसला झेलबाद केले. त्याने 43 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारासह 65 धावा झोडपल्या. कॅमेरून ग्रीन आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांनी तिसऱ्या गड्यासाठी 27 षटकात अभेद्य 149 धावांची शतकी भागीदारी करत आपल्या संघाला हा सामना 8 गड्यांनी एकतर्फी जिंकून दिला. ग्रीनने 104 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारासह नाबाद 77 तर स्टिव्ह स्मिथने 79 चेंडूत 8 चौकारासह नाबाद 79 धावा जमवल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावात 3 षटकार आणि 22 चौकार नोंदवले गेले. विंडीजतर्फे मोती आणि फोर्ड यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. यजमान ऑस्ट्रेलियाचा हा वनडे प्रकारातील सलग दहावा विजय आहे. यामध्ये गेल्या वर्षी झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारतावर अंतिम फेरीत नोंदवलेल्या विजयाचा समावेश आहे. या मालिकेतील दुसरा सामना रविवारी सिडनीच्या मैदानावर होणार आहे.
संक्षिप्त धावफलक : विंडीज 48.4 षटकात सर्वबाद 231 (कार्टी 88, चेस 59, होप 12, हॉज 11, हेडन वॉल्श 20, फोर्ड 19, अवांतर 11, झेवियर बार्टलेट 4-17, अॅबॉट 2-42, ग्रीन 2-40, झाम्पा 1-56), ऑस्ट्रेलिया 38.3 षटकात 2 बाद 232 (हेड 4, इंग्लिश 65, ग्रीन नाबाद 77, स्मिथ नाबाद 79, अवांतर 7, फोर्ड 1-37, मोती 1-58).









