पहिल्या टी-20 सामन्यात आफ्रिकेचा दारुण पराभव : मिचेल मार्श, टीम डेविडची तुफानी फटकेबाजी : तनवीर सांघाचे 4 बळी
वृत्तसंस्था /दरबान (द.आफ्रिका)
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला बुधवारी (30 ऑगस्ट) सुरुवात झाली. दरबान येथे झालेल्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने जबरदस्त सांघिक खेळ दाखवला. कर्णधार मिचेल मार्श व टीम डेव्हिड यांनी तुफानी अर्धशतके केल्यानंतर पदार्पण करणारा फिरकीपटू तनवीर सांघाने चार बळी घेतल्याने, ऑस्ट्रेलियाने तब्बल 111 धावांनी विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता, उभय संघातील दुसरा सामना आज शुक्रवारी दरबान येथे होईल. 49 चेंडूत नाबाद 92 धावांची खेळी साकारणाऱ्या मिचेल मार्शला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्श व टीम डेव्हिड यांनी वादळी फटकेबाजी केली. मार्शने शानदार खेळी साकारताना 49 चेंडूत 13 चौकार व 2 षटकारासह 92 धावांची नाबाद खेळी केली. तर दुसऱ्या बाजूने टीम डेव्हिडने अवघ्या 28 चेंडूत 7 चौकार व 4 षटकारासह 64 धावा कुटल्या. त्यांच्या या फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने निर्धारित 20 षटकात 226 धावांचा डोंगर उभा केला. याशिवाय, अॅरॉन हार्डीने 23 तर सलामीवीर मॅथ्यू शॉटने 20 धावा केल्या. द.आफ्रिकेकडून लिजा विल्यम्सने सर्वाधिक 3 बळी घेतले.
आफ्रिकन फलंदाजांकडून सपशेल निराशा
विजयासाठीच्या 227 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव पहिल्या षटकापासून घसरायला सुरुवात झाली. सलामीवीर रिझा हॅन्ड्रिक्स वगळता इतर कोणताही फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीचा सामना करू शकला नाही. यजमान आफ्रिकेचा डाव 15.3 षटकांत 115 धावांवर संपुष्टात आला. या सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा लेगस्पिनर तनवीर सांघाने यजमानांच्या डावाला सुरुंग लावला. त्याने अवघ्या 31 धावांत 4 बळी घेत ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. तर वेगवान गोलंदाजांनी अखेरचे फलंदाज झटपट बाद करत दक्षिण आफ्रिकेचा डाव 115 धावांवर संपवत तब्बल 111 धावांनी दणदणीत विजय साजरा केला. रिझा हॅन्ड्रिक्सने सर्वाधिक 43 चेंडूत 56 धावा केल्या. रॉस्यूने 21 तर मार्को जान्सनने 20 धावा केल्या. मार्क स्टोइनिसने 3 तर स्पेन्सर जॉन्सनने 2 गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला.









