तिसऱ्या टी-20 सामन्यातही ऑसी संघ 5 गड्यांनी विजयी : मायदेशात टी-20 मालिका गमावण्याची आफ्रिकेवर नामुष्की
वृत्तसंस्था/ डर्बन (द.आफ्रिका)
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने सलग तिसऱ्या टी-20 सामन्यात विजय मिळवला. पाहुण्या संघाने यजमान दक्षिण आफ्रिकेला तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 3-0 अशा फरकाने मात दिली. रविवारी झालेल्या सामन्यात द.आफ्रिकेने 20 षटकांत 8 बाद 190 धावा केल्या. यानंतर ऑसी संघाने विजयी लक्ष्य 17.5 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करत विजयाला गवसणी घातली. 48 चेंडूत 91 धावांची खेळी साकारणाऱ्या ट्रेव्हिस हेडला सामनावीर तर मालिकेत 186 धावा करणाऱ्या मिचेल मार्शला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. आता, उभय संघात पाच सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार असून यातील पहिला सामना दि. 7 रोजी होईल.
दक्षिण आफ्रिका संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 190 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेचा एकही फलंदाज अर्धशतक करू शकला नाही. पण त्यांच्या संघातील डोनोव्हन फरेरा (48), ऍडेन मॅरक्रम (41) आणि सलामीवीर रीझा हेंड्रिक्स (42) यांनी महत्वपूर्ण धावा केल्या. युवा फलंदाज स्टब्जने 25 धावांचे योगदान दिले तर कोटीजने 13 धावा केल्या. इतर फलंदाजांनी मात्र सपशेल निराशा केल्यामुळे आफ्रिकेला दोनशेचा टप्पा गाठता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून सीन ऍबॉटने 4 षटकात 31 धावा देत सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर मार्क स्टोनिसने दोन बळी मिळवले.
ट्रेव्हिस हेडची वादळी खेळी
दरम्यान, आफ्रिकेने विजयासाठी दिलेले 191 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने 17.5 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यातच पार केले. सुरुवातीला सलामीवर मॅथ्यू शॉर्टला भोपळाही फोडता आला नाही तर कर्णधार मिचेल मार्श 15 धावा काढून बाद झाला. मात्र ट्रेव्हिस हेडने आक्रमक खेळताना अवघ्या 48 चेंडूत 8 चौकार व 6 षटकारासह 91 धावा कुटल्या. त्याला जोस इंग्लिसने 22 चेंडूत 42 धावा करत चांगली साथ दिली. इंग्लिस बाद झाल्यानंतर हेड व मार्क स्टोनिस यांनी संघाच्या धावसंख्येला आकार दिला. मात्र शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या हेडला 91 धावांवर फोर्टिनने बाद केले. स्टोनिसने 21 चेंडूत नाबाद 37 धावा केल्या. आफ्रिकेकडून फोर्टिन व कोटीज यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक : द.आफ्रिका 20 षटकांत 8 बाद 190 (हेडिंक्स 42, मॅरक्रम 41, फरेरा 48, स्टब्ज 25, अॅबॉट 31 धावांत 4 बळी, स्टोनिस 39 धावांत 2 बळी)
ऑस्ट्रेलिया 17.5 षटकांत 5 बाद 191 (ट्रेव्हिस हेड 91, जोस इंग्लिस 42, स्टोनिस नाबाद 37, मिचेल मार्श 15, फोर्टिन व कोटीज प्रत्येकी दोन बळी).