वृत्तसंस्था/सिडनी
2024च्या ऑक्टोबर महिन्यात बांगलादेशमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत खेळणे ही ऑस्टेलीयन महिला संघासमोर मोठी सत्वपरीक्षा ठरेल, असे प्रतिपादन ऑस्ट्रेलियन महिला संघाची कर्णधार अॅलीसा हिलीने केले आहे.
सध्या बांगलादेशमधील परिस्थिती तणावग्रस्त असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंसक घटना घडत आहेत. या तणावग्रस्त परिस्थितीमुळे साहजिकच ऑस्ट्रेलियन महिला संघावर मानसिक दडपण राहणे साहजिकच आहे. सध्या बांगलादेशच्या काळजीवाहू शासनाचे नेतृत्व नोबेल पारितोषक विजेते मोहम्मद युनुस करीत आहेत. आयसीसीची ही स्पर्धा 3 ते 19 ऑक्टोबर दरम्यान बांगलादेशमध्ये खेळविण्याचे निश्चित केले आहे. सदर स्पर्धेमध्ये विद्यमान विजेत्या ऑस्ट्रेलियासह एकूण 10 संघांचा समावेश आहे. बांगलादेशमधील तणावग्रस्त परिस्थितीकडे आयसीसीचे लक्ष असून चालु आठवड्या अखेर या स्पर्धेसंदर्भात अंतिम निर्णय अपेक्षित आहे. अलिकडेच ऑस्ट्रेलियन संघाने बांगलादेशमध्ये एकूण सहा सामने खेळले होते. हे सामने ढाक्यातील शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियममध्ये झाले. 2014 नंतर ऑस्ट्रेलियन महिला संघ पहिल्यांदाच बांगलादेशमध्ये खेळणार आहे. 2014 साली टी-20 विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद बांगलादेशने भूषविले होते. गेल्या मार्च, एप्रिल दरम्यान झालेले सर्व सहा सामने ऑस्ट्रेलियन संघाने जिंकले आहेत. बांगलादेशमधील खेळपट्ट्या आणि वातावरण यांच्याशी जुळवून घेताना ऑस्ट्रेलियन संघाची सत्वपरीक्षा ठरेल, असेही हिलीने म्हटले आहे. बांगलादेशमधील पुढील महिन्यात होणाऱ्या या स्पर्धेच्या स्थलांतराबाबतचा निर्णय आयसीसीकडून लवकरच होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियन महिला संघाने जोरदार सराव केला असून यावेळी पुन्हा आम्ही सदर स्पर्धेचे जेतेपद स्वत:कडे राखण्याचा प्रयत्न करेन, अशी प्रतिक्रिया कर्णधार हिलीने वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केली.









