आर्यन शर्मा, यश देशमूख यांचा ऑस्ट्रेलियन चमुत समावेश
वृत्तसंस्था / मेलबोर्न
पुढील महिन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया 19 वर्षांखालील वयोगटातील संघामध्ये ऑस्ट्रेलियात खेळविल्या जाणाऱ्या मालिकेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने संघाची घोषणा केली. या संघामध्ये भारतीय वंशाचे आर्यन शर्मा आणि यश देशमूख यांचा समावेश आहे.
या आगामी मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या 15 सदस्यांच्या ऑस्ट्रेलियन संघामध्ये व्हिक्टोरिया संघातील फलंदाज आर्यन शर्मा त्याच प्रमाणे न्यू साऊथ वेल्स संघातील अष्टपैलु यश देशमूख यांच्यासह अन्य पाच खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षांखालील संघाला ऑस्ट्रेलियाचे माजी प्रमुख प्रशिक्षक टीम निल्सन यांचे मार्गदर्शन लाभत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया युवा संघामध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका आयोजित केली आहे. या मालिकेतील सामने ब्रिस्बेनच्या इयान हिली ओव्हल मैदानावर 21, 24, 26 सप्टेंबर रोजी होतील. त्यानंतर या दोन संघामध्ये चार दिवसांचे दोन सामने खेळविले जाणार आहेत. पहिला सामना 30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान ब्रिस्बेनमध्ये तर दुसरा सामना मॅके येथे 7 ते 10 ऑक्टोबर दरम्यान होईल. ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ संघाला 2007 आणि 2011 साली टीम निल्सन यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले होते. ते ऑस्ट्रेलियन संघाचे प्रमुख प्रशिक्षक होते. आता निल्सन ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षांखालील वयोगटातील संघाला मार्गदर्शन करणार आहेत.
ऑस्ट्रेलियन संघ : सिमॉन बज, अॅलेक्स टर्नर, स्टिव्ह होगेन, विन मॅलाझुक, यश देशमूख, टॉम होगेन, आर्यन शर्मा, जॉन जेम्स, हेडन स्किलेर, चार्ल्स लेचमंड, बेन गॉर्डन, विल बिरॉम, केसी बार्टन, अॅलेक्स यंग, जायडेन डेपर.









