वृत्तसंस्था / माद्रीद
टेनिस हा क्रीडा प्रकार नेहमीच जीवंत राहिल, पण या क्रीडा प्रकारात खूपच बदल होत असल्याचे प्रतिपादन सर्बियाचा माजी टॉपसिडेड तसेच विक्रमी 24 ग्रॅन्डस्लॅम अजिंक्यपदे मिळविणाऱ्या नोव्हॅक जोकोविचने केले आहे.
टेनिस क्षेत्रातील होत असलेले बदल आता शौकीन स्वीकारात आहेत. टेनिस क्षेत्रातील दिग्गज रॉजर फेडरर, राफेल नदाल तसेच कालांतराने जोकोविच या क्षेत्रात दिसणार नाहीत. पण टेनिस हा क्रीडा प्रकार कायम जीवंत राहिल,अशी ग्वाही 37 वर्षीय जोकोविचने दिली आहे. येथे सुरू झालेल्या एटीपी टूरवरील माद्रीद मास्टर्स खुल्या पुरुष आणि महिलांच्या टेनिस स्पर्धेत जोकोविच सहभागी झाला असून तो आता या स्पर्धेत आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीतील एटीपी टूरवरील 100 वे जेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे.
टेनिस या क्रीडा प्रकाराला शौकिनांच्या उपस्थितीमध्ये प्रचंड वाढ होत असल्याचे दिसून येते. फेडरर, नदाल, अॅन्डी मरे हे दिग्गज टेनिसपटू खेळत नसतानाही नव्या पिढीतील टेनिसपटूंनी आपल्या दर्जेदार कामगिरीच्या जोरावर शौकिनांना या क्रीडा प्रकाराकडे खेचले आहे. टेनिसमध्ये झपाट्याने बदल होत असून ते प्रत्येक टेनिसपटूला स्वीकारावे लागतील, असे जोकोविचने म्हटले आहे. जोकोविचने आतापर्यंत तीनवेळा माद्रीद मास्टर्स टेनिस स्पर्धा जिंकली आहे. त्याने आतापर्यंत एटीपी टूरवरील 99 स्पर्धा जिंकल्या आहेत. आता तो 100 वे जेतेपद मिळविण्यासाठी आतुरलेला आहे. टेनिस क्षेत्रामध्ये एटीपी टूरवर जिमी कॉनर्सने 109 तर रॉजर फेडररने 103 स्पर्धा जिंकल्या आहेत









