वृत्तसंस्था / पर्थ
सलिमा टेटेच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला हॉकी संघाला ऑस्ट्रेलियाचा दौरा अत्यंत उपयोगी आणि महत्त्वाचा ठरणार आहे. या दौऱ्यातून भारतीय हॉकी संघाला स्वत:चा दर्जा समजू शकेल, असे प्रतिपादन प्रमुख प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांनी म्हटले आहे. या दौऱ्यातील भारताचा पहिला सामना शनिवारी 26 एप्रिल रोजी ऑस्ट्रेलिया अ महिला हॉकी संघाबरोबर होत आहे. या दौऱ्यामध्ये भारतीय महिला हॉकी संघ एकूण 5 मित्रत्वाचे सामने खेळणार आहे. 26 आणि 27 एप्रिलला भारताचे दोन सामने ऑस्ट्रेलिया अ संघाबरोबर होणार असून त्यानंतर 1, 3 आणि 4 मे रोजी भारताचे तीन सामने ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ महिला संघाबरोबर होणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय महिला हॉकी संघाकरिता बेंगळूरच्या साई केंद्रामध्ये महिनाभराच्या कालावधीसाठी सरावाचे शिबिर आयोजित केले होते. आगामी प्रो लीग हॉकी स्पर्धेचा युरोप टप्पा आणि चालु वर्षाअखेरीस होणाऱ्या महिलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेसाठी भारतीय महिला हॉकी संघाला अनुभवाच्या दृष्टिकोनातून तसेच आपला दर्जा समजण्यासाठी हा ऑस्ट्रेलिया दौरा महत्त्वाचा राहील, असे प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांनी म्हटले आहे.









