अमेरिका-ब्रिटननंतर आणखी एका देशाचा निर्णय ः हेरगिरी टाळणार
वृत्तसंस्था/ कॅनबरा
ऑस्ट्रेलिया सरकारने स्वतःच्या संरक्षण विभागाच्या इमारतींमधून चीनशी निगडित कंपन्यांकडून निर्मित टेहळणी कॅमरे हटविण्याचा निर्णय घेतला आहे. संरक्षण विभाग स्वतःच्या सर्व देखरेख तंत्रज्ञानांची समीक्षा करत आहे. चीनकडून निर्मित सर्व कॅमेरे हटविण्यात येणार असल्याचे ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान तसेच संरक्षणमंत्री रिचर्ड मार्लेस यांनी सांगितले आहे.
चिनी कंपन्या हिकव्हिजन आणि दहुकाकडून विकसित आणि निर्मित 913 कॅमेरे, इंटरकॉम, इलेक्ट्रॉनिक एंट्री सिस्टीम आणि व्हिडिओ रिकॉर्डर्सचा वापर संरक्षण विभाग आणि व्यापार तसेच विदेश विभागासह सरकारी कार्यालयांमध्ये करण्यात आला आहे.

अमेरिकेच्या हवाईक्षेत्रात हेरगिरी करणारा चीनचा बलून आढळून आल्यावर अमेरिका अन् चीनमधील तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी अमेरिका आणि ब्रिटनने शासकीय कार्यालयांमधून चीनच्या कंपन्यांकडून निर्मित सीसीटीव्ही कॅमेरे तसेच देखरेख यंत्रणा हटविण्याचा निर्णय घेतला आहे.
चीन हा देखरेख यंत्रणेशी निगडित उपकरणांचा सर्वात मोठा उत्पादक आणि पुरवठादार आहे. निम्म्याहून अधिक टेहळणी उपकरणे आणि कॅमेरे चीनकडूनच जगाला पुरविण्यात येतात. हीच उपकरणे आता सर्वसामान्यांपासून अनेक देशांच्या सरकारांसाठी अडचणीच्या ठरल्या आहेत. चीनकडून निर्मित सर्व्हिलान्स कॅमेरे हे इंटरनेट आधारित ऍपद्वारे संचालित होतात. या ऍपला स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल केल्यावर संबंधिताला त्याच्या अटींना मंजुरी द्यावी लागते. यामुळे याचा डाटा चीनपर्यंत पोहोचतो. तसेच चिनी कंपनीला कम्युनिस्ट सरकारकडून मागणी झाल्यावर डाटा पुरविणे बंधनकारक आहे.
भारतातही खबरदारीची गरज
भारत सरकारच्या माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाने चिनी कंपन्यांकडून निर्मित सुमारे 10 लाख सीसीटीव्ही कॅमेरे शासकीय संस्थांमध्ये बसविण्यात आल्याची माहिती संसदेला दिली होती. अमेरिकेतील थिंक टँक सेंटर फॉर स्ट्रटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजनुसार जगातील 33 हजार शहरांमध्ये 48 लाखाहून अधिक चिनी कॅमेरे सदैव इंटरनेटशी कनेक्टेड असतात. भारत सरकारच्या संस्था विशेषकरून इस्रो, संरक्षण विभाग, विदेश विभाग, सेन्य इत्यादी अत्यंत संवेदनशील भागांमध्ये चिनी उपकरणांमुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. संवेदनशील माहिती चिनी हेरांपासून वाचविण्यासाठी इंटरनेट आधारित सर्व्हिलान्स सिस्टीमपासून अंतर राखणे गरजेचे ठरले आहे.









