वृत्तसंस्था/कॅनबरा
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बानीज यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलिया देखील पॅलेस्टाइनला मान्यता देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. फ्रान्स, ब्रिटन आणि कॅनडासोबत मिळून पॅलेस्टाइनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्याचे संकेत अल्बानीज यांनी सोमवारी दिले. गाझामध्ये उपासमारी अणि मोठ्या संख्येत लोकांचा मृत्यू होत असून याच्या विरोधात आवाज उठविला जात आहे. ऑस्ट्रेलियात देखील गाझामधील मानवीय संकटाच्या विरोधात निदर्शने होत आहेत. पंतप्रधान अल्बानीज यांच्या मंत्रिमंडळातील अनेक सदस्यांनी पॅलेस्टाइनला स्वतंत्र देशाच्या स्वरुपात मान्यता देण्याची मागणी केली होती.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी गाझावर नियंत्रण मिळविण्याची योजना मंजूर केली असून या निर्णयावर ऑस्ट्रेलियाच्या सरकारने टीका केली. पॅलेस्टाइनला मान्यता देण्यापूर्वी काही अटी घातल्या जाणार आहेत. यानुसार पॅलेस्टाइनमध्ये हमासची कुठलीच भूमिका नसावी तसेच गाझात सैन्यशक्ती असू नये, याचबरोबर तेथे निवडणूक घेण्यात यावी. द्विराष्ट्र तोडग्याद्वारेच पश्चिम आशियात हिंसेचे चक्र रोखता येणार आहे. यामुळे संघर्षाचा अंत होणार असल्याचे अल्बानीज यांनी म्हटले.









