वृत्तसंस्था / जोहोर बेहरु (मलेशिया)
शनिवारी येथे खेळविण्यात आलेल्या 21 वर्षांखालील वयोगटातील तिसऱ्या सुलतान जोहोर चषक हॉकी स्पर्धेचे अजिंक्यपद बलाढ्या ऑस्ट्रेलियाने पटकाविले. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ग्रोबेलरने दोन गोल केले.
हा अंतिम सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. ऑस्ट्रेलियन संघातील ग्रोबेलरने 13 व्या मिनिटाला आपल्या संघाचे खाते मैदानी गोलाने उघडले. सामन्याच्या 15 मिनिटांतील कालावधीत भारताने ऑस्ट्रेलियाशी बरोबरी साधली. 17 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर अनमोल एक्काने भारताचा गोल नोंदविला. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. या सामन्यातील तिसऱ्या 15 मिनिटांच्या कालावधीत दोन्ही संघांनी गोल करण्याचा प्रयत्न केला. पण भक्कम गोलरक्षणामुळे ही कोंडी कायम राहिली. शेवटच्या 15 मिनिटांच्या कालावधीत ऑस्ट्रेलियाने दुसरा आणि निर्णायक गोल केला. ग्रोबेलरने 58 व्या मिनिटाला संघाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर दुसरा आणि निर्णायक गोल करुन भारताचे आव्हान संपुष्टात आणले. या सामन्यातील शेवटच्या दोन मिनिटामध्ये भारताला सहा पेनल्टी कॉनर्स मिळाले. पण ऑस्ट्रेलियाच्या गोलरक्षकाने भारताचे हे कॉनर्स थोपवून आपल्या संघाला जेतेपद मिळवून दिले. 2022 साली ऑस्ट्रेलियाला भारताकडून अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. ऑस्ट्रेलियन संघाने तब्बल तीन वर्षांनंतर या मागील पराभवाची परतफेड केली. या स्पर्धेतील गेल्या तीन खेपेला ऑस्ट्रेलियन हॉकी संघाला अंतिम फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले होते.









