वृत्तसंस्था/मुंबई
बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ऑस्ट्रेलियाचा हा दौरा अ पुरुष आणि महिला क्रिकेट संघाचा असणार आहे. याशिवाय, दक्षिण आफ्रिकेचा अ संघ देखील भारत दौऱ्यावर येणार आहे. ऑस्ट्रेलियाचा महिला संघ, ऑस्ट्रेलिया अ व दक्षिण आफ्रिका अ असे पुरुष संघ सप्टेंबर ते डिसेंबर 2025 या कालावधीत भारत द्रौयावर येणार आहेत आणि एकूण 13 सामने खेळणार आहेत. बीसीसीआयने तिन्ही संघांच्या दौऱ्यासह 13 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ऑस्ट्रेलियाचा महिला संघ 14 ते 20 सप्टेंबर दरम्यान भारतासोबत 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया अ पुरुष संघाचा दौरा 2 कसोटी सामने आणि 3 वनडे सामन्यांसाठी असेल. ऑस्ट्रेलियाचा संघ 16 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान भारत दौऱ्यावर असेल. ऑस्ट्रेलियन संघाच्या दौऱ्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा पुरुष अ संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. त्यांचा दौरा 30 ऑक्टोबरपासून सुरु होईल आणि 19 नोव्हेंबरपर्यंत चालेल. या काळात 2 कसोटी सामने आणि 3 वनडे मालिका खेळवल्या जातील.









