वृत्तसंस्था/ पोश्चेफस्ट्रुम (दक्षिण आफ्रिका)
येथे सुरू असलेल्या आयसीसीच्या महिलांच्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाच्या विजयी घोडदौडीला ऑस्ट्रेलियाने लगाम घातला. शनिवारी या स्पर्धेतील झालेल्या सुपर सिक्स पेरीतील सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा सात गडय़ांनी पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या मिली इलिंगवर्थला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताचा डाव 18.5 षटकात 87 धावात आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 13.5 षटकात 3 बाद 88 धावा जमवित हा सामना सात गडय़ांनी जिंकला.
भारताच्या डावामध्ये केवळ तीन फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. श्वेता सेरावतने 3 चौकारासह 21, बसूने 1 चौकारासह 14 तर साधूने 2 चौकारासह 14 धावा जमविल्या. कर्णधार शेफाली वर्मा तसेच पी. चोप्रा यांनी प्रत्येकी 8 धावा केल्या. रिचा घोष 7 धावावर बाद झाली. भारताच्या डावामध्ये केवळ 10 चौकार नोंदवले गेले. ऑस्ट्रेलियातर्फे इलिंगवर्थ, मॅगी क्लार्क यांनी प्रत्येकी दोन तर सायना जिंजिरने 13 धावात धावात 3 गडी बाद केले. मॅकेना आणि हेवर्ड यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाच्या डावात सलामीच्या पेलेने 13 चेंडूत 3 चौकारासह 17, सायना जिंजिरने 1 चौकारासह 11, क्लेरी मूरने 28 चेंडूत 1 षटकार आणि 1 चोकारासह नाबाद 25, हेवर्डने 1 चौकारासह 7 तर ऍमि स्मिथने 25 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 26 धावा जमवल्या. मूर आणि स्मिथ यांनी विजयाचे सोपस्कार करताना चौथ्या गडय़ासाठी अभेद्य 51 धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाच्या डावात 2 षटकार आणि 7 चौकार नोंदवले गेले. भारतातर्फे साधू, अर्चना देवी आणि सोनम यादव यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
सुपर सिक्स फेरीतील या पराभवामुळे भारताच्या नेट रटवर परिणाम झाला आहे. भारतीय संघाचा सध्या रनरेट प्लस 1.905 असा आहे. आता भारताला आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी पुढील निर्णायक सामन्यात अधिक दर्जेदार कामगिरी करताना विजयी मिळवणे गरजेचे आहे. सुपर सिक्स फेरीमध्ये गट 1 मध्ये सध्या ऑस्ट्रेलिया, भारत, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांनी प्रत्येकी 4 गुण मिळवले आहेत. तर श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिरात यांना आपले खाते उघडता आलेले नाही. या पराभवामुळे या गटात भारत दुसऱया स्थानावर राहिला असून ऑस्ट्रेलिया आघाडीवर आहे.
संक्षिप्त धावफलक ः भारत 18.5 षटकात सर्वबाद 87 (श्वेता सेरावत 21, बसू 14, साधू 14, जिंजिर 3-13, इलिंगवर्थ 2-12, क्लार्क 2-18, मॅकेना 1-18, हेवर्ड 1-13), ऑस्ट्रेलिया 13.5 षटकात 3 बाद 88 (मूर नाबाद 25, स्मिथ नाबाद 26, जिंजर 11, पेले 17, हेवर्ड 7, साधू, अर्चना देवी आणि सोनम यादव प्रत्येकी एक बळी).









