वृत्तसंस्था / बांगी (मलेशिया)
येथे सुरू असलेल्या आयसीसीच्या 19 वर्षांखालील वयोगटाच्या महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत शनिवारी खेळविण्यात आलेल्या विविध सामन्यांत ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि द. आफ्रिका यांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविले.
पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला संघाने विंडीजचा 7 गड्यांनी पराभव करत या स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या समीप वाटचाल केली आहे. प्रथम फलंदाजी करताना विंडीजचा डाव 16.3 षटकात 53 धावांत आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 3 गड्याच्या मोबदल्यात 10.5 षटकात विजयाचे उद्दिष्ट गाठले.
दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने अमेरिकेचा 18 धावांनी पराभव केला. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 97 धावा जमविल्या. मात्र त्यानंतर अमेरिकेला हे सोपे उद्दिष्ट पार करता आले नाही. अमेरिकेने 79 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना गमवावा लागला. तिसऱ्या सामन्यात द. आफ्रिकेने आयर्लंडचा 7 गड्यांनी पराभव केला. पावसाच्या अडथळ्यामुळे हा सामना प्रत्येकी 10 षटकांचा खेळविला गेला. इंग्लंड आणि नायझेरीया यांच्यातील सामना पावसामुळे वाया गेल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण देण्यात आला.









