वृत्तसंस्था/ धर्मशाला
विश्वचषकात आज शनिवारी येथे होणार असलेल्या ‘ब्लॉकबस्टर’ लढतीत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे ट्रान्स-टास्मान प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार असून यावेळी ऑस्ट्रेलिया आपली विजयी घोडदौड कायम राखण्याचा आणि न्यूझीलंडवरही वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करेल. यजमान भारत आणि दक्षिण आफ्रिकेविऊद्ध पराभव स्वीकारावे लागलेल्या ऑस्ट्रेलियाने तीन विजय नोंदविलेले असून त्यात नेदरलँड्सवरील विक्रमी 309 धावांनी मिळविलेल्या विजयाचा समावेश आहे.
स्पर्धेच्या निर्णायक टप्प्यात प्रवेश करताना पाच वेळचा विजेता ऑस्ट्रेलिया सध्या पाच सामन्यांनंतर चौथ्या स्थानावर म्हणजे न्यूझीलंडपेक्षा एक स्थान मागे आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघ अव्वल चारमधील आपले स्थान मजबूत करण्याचा निश्चितच प्रयत्न करेल. जरी न्यूझीलंड हा स्पर्धेतील अव्वल संघांपैकी एक असला तरी, आतापर्यंतचा इतिहास पाहता ऑस्ट्रेलियाचे पारडे जड वाटते. या दोन संघांमध्ये झलेल्या विश्वचषकातील 11 सामन्यांपैकी आठ, तर एकूण 141 एकदिवसीय सामन्यांपैकी 95 ऑस्ट्रेलियाने जिंकलेले आहेत. या स्पर्धेतील न्यूझीलंडचा ऑस्ट्रेलियावरचा शेवटचा विजय 2017 मध्ये नोंदला गेला होता.
डेव्हिड वॉर्नरला सलग दोन शतकांनी या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये पहिल्या तीन स्थानावर नेले आहे. पण ऑस्ट्रेलियाला स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन यासारख्या मधल्या फळीतील फलंदाजांकडून अधिक सातत्याची अपेक्षा असेल. ग्लेन मॅक्सवेलचे स्पर्धेच्या इतिहासातील सर्वांत जलद शतक हे या अष्टपैलू खेळाडूस चांगली प्रेरणा देऊ जाईल. तथापि, कॅमेरून ग्रीनच्या फॉर्मबद्दल काही चिंता आहेत. मिचेल स्टार्कने (7 बळी) गेल्या दोन सामन्यांमध्ये काहीसा दिशाहीन मारा केलेला असून जोश हेझलवूड (6 बळी) आणि कर्णधार कमिन्स (6 बळी) हे देखील आपल्या माऱ्याची धार वाढविण्यास इच्छुक असतील.
अॅडम झाम्पाने नेदरलँड्सविऊद्ध चार बळी मिळविल्यामुळे या लेगस्पिनरच्या आत्मविश्वासाला मोठी चालना मिळेल. ट्रॅव्हिस हेड दुखापतीतून सावरला आहे आणि तो या लढतीसाठी संघात परतण्याची अपेक्षा आहे. मात्र योग्य संतुलन राखून ऑस्ट्रेलिया संघरचना कशी करतो ते पाहावे लागेल. दुसरीकडे, गेल्या रविवारी भारताने चार गडी राखून पराभूत केल्यामुळे न्यूझीलंडची विजयी घोडदौड संपुष्टात आली आहे. परंतु किवीजचा आत्मविश्वास अजूनही डगमगलेला नसेल. न्यूझीलंड डेव्हन कॉनवेकडून (249 धावा) चांगल्या पुनरागमनाची आशा बाळगून असेल. केन विल्यमसन अजूनही फ्रॅक्चर झालेल्या अंगठ्यातून सावरलेला नसल्याने डॅरिल मिशेल आणि रचिन रवींद्र यांना मधल्या फळीत जबाबदारी पेलावी लागेल. विल्यमसनच्या अनुपस्थितीत यष्टिरक्षक टॉम लॅथम संघाचे नेतृत्व करेल, परंतु त्यालाही त्याच्या फॉर्मची चिंता असेल.
हा सामना म्हणजे झाम्पा आणि मिचेल सँटनर या दोन फिरकी गोलंदाजांमधीलही एक प्रकारची लढत आहे. न्यूझीलंडचे वेगवान गोलंदाज मॅट हेन्री (10 बळी) आणि लॉकी फर्ग्युसन (8 बळी) यांनी आतापर्यंत प्रभावी कामगिरी केली आहे, परंतु अनुभवी ट्रेंट बोल्टला (6 बळी) कामगिरी सुधारावी लागेल.
संघ : ऑस्ट्रेलिया-पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, सीन अॅबॉट, अॅश्टन आगर, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मिच मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.
न्यूझीलंड : केन विल्यमसन (कर्णधार-खेळणार नाही), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम (हंगामी कर्णधार), डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउदी आणि विल यंग.
वेळ : सकाळी 10.30 वा.









