वृत्तसंस्था /मेलबर्न
ऑस्ट्रेलिय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मेग लॅनिंगने गुरुवारी येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीची अधिकृत घोषणा केली. लॅनिंगने आपल्या 13 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये दर्जेदार कामगिरीच्या जोरावर सातवेळा ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाला विश्वविजेतेपद मिळवून दिले. तिने यापैकी पाचवेळा ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व केले होते. 31 वर्षीय मेग लॅनिंगने गेल्या वर्षी आपल्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक मिळवून दिले होते. ऑस्ट्रेलियातर्फे क्रिकेटच्या विविध प्रकारात मेग लॅनिंग ही सर्वाधिक धावा जमवणारी क्रिकेटपटू आहे. तिने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत एकूण 241 सामन्यात (6 कसोटी, 103 वनडे अणि 132 टी-20 सामन्यात) 8352 धावा जमवल्या आहेत. आपण योग्यवेळी निवृत्तीचा निर्णय घेतला असून तो घेत असताना मला खूपच अवघड गेले, अशी प्रतिक्रिया लॅनिंगने व्यक्त केली. गेल्या दशकामध्ये लॅनिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाने जागतिक क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व ठेवले होते. लॅनिंगच्या गैरहजरीत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व अॅलिसा हिलीकडे सोपवण्यात आले होते. अलीकडे प्रकृती नादुरुस्तीमुळे लॅनिंगला इंग्लंड, आयर्लंड तसेच विंडीजविरुद्ध झालेल्या मालिकांना मुकावे लागले होते. 2022 च्या क्रिकेट हंगामात तिने तब्बल 6 महिने विश्रांती घेतली होती. दरम्यान तिच्या प्रकृती नादुरुस्तीचे कारण मात्र अद्याप गुपितच राहिले आहे.









