विंडीज प. डाव 143, ऑस्ट्रेलिया दु. डाव 6 बाद 99
वृत्तसंस्था / किंग्जस्टन
येथे सुरू असलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाने यजमान विंडीजवर एकूण 181 धावांची आघाडी घेत आपली स्थिती अधिक मजबूत केली आहे. विंडीजचा पहिला डाव 143 धावांत आटोपल्यानंतर विंडीजच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या डावात स्थिती 6 बाद 99 अशी केविलवाणी झाली आहे.
या मालिकेतील पहिले सलग दोन सामने जिंकून कांगारुनी विजयी आघाडी घेतली आहे. या शेवटच्या कसोटीत दोन्ही संघातील वेगवान गोलंदाजांनी दर्जेदार कामगिरी केली. खेळाच्या पहिल्या दिवशी एकूण 11 गडी बाद झाले. तर खेळाच्या दुसऱ्या दिवशी गोलंदाजांनी एकूण 15 बळी मिळविले.
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 225 धावांवर आटोपल्यानंतर विंडीजने 1 बाद 16 या धावसंख्येवरुन खेळाला पुढे सुरूवात केली आणि त्यांचे 9 गडी 127 धावांत बाद झाले. कॅम्पबेलने 4 चौकारांसह 36, हॉपने 3 चौकारांसह 23, कर्णधार चेसने 1 चौकारासह 18, किंगने 2 चौकारांसह 14 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियातर्फे बोलॅन्डने 3 तर हॅजलवूड, कमिन्स यांनी प्रत्येकी 2 तसेच स्टार्क आणि वेबस्टर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. उपाहारावेळी विंडीजने 32 षटकात 3 बाद 73 धावा जमविल्या होत्या. तर चहापानावेळी विंडीजचा डाव 52.1 षटकात 143 धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाने विंडीजवर पहिल्या डावात 82 धावांची आघाडी घेतली.
82 धावांनी आघाडी मिळविलेल्या ऑस्ट्रेलियाने चहापानानंतरच्या शेवटच्या सत्रामध्ये आपले 6 गडी 99 धावांत गमविले. कॅमरुन ग्रीन एकाकी लढत देत 6 चौकारांसह 42 धावांवर खेळत आहे. ख्वॉजाने 2 चौकारांसह 14, हेडने 3 चौकारांसह 16, वेबस्टरने 2 चौकारांसह 13 धावा जमविल्या. विंडीजतर्फे जोसेफने 19 धावांत 3 तर शमार जोसेफने 26 धावांत 2 तसेच ग्रीव्हेसने 1 गडी बाद केला. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात शमार जोसेफने 4 तर ग्रीव्हेसने 3 आणि सेल्सने 3 गडी बाद केले होते. या कसोटीतील खेळाचे तीन दिवस बाकी असून विंडीजचा संघ व्हाईट वॉश टाळण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करेल.
संक्षिप्त धावफलक: ऑस्ट्रेलिया प. डाव 225, विंडीज प. डाव 52.1 षटकात सर्वबाद 143 (कॅम्पबेल 36, हॉप 23, चेस 18, ग्रीव्हेस 18, किंग 14, बोलॅन्ड 3-34, हॅजलवूड, कमिन्स प्रत्येकी 2 बळी, स्टार्क, वेबस्टर प्रत्येकी 1 बळी), ऑस्ट्रेलिया दु. डाव 29 षटकात 6 बाद 99 (ग्रीन खेळत आहे 42, हेड 16, वेबस्टर 13, ख्वॉजा 14, अल्झारी जोसेफ 3-19, शमार जोसेफ 2-26, ग्रीव्हेस 1-19)









