अॅशेस मालिकेतील दुसरी कसोटी : इंग्लंड प. डाव सर्व बाद 325
वृत्तसंस्था/ लंडन
पाच सामन्यांच्या अॅशेस मालिकेतील येथील लॉर्डस् मैदानावर सुरु असलेल्या दुसऱ्या सामन्यात शुक्रवारी खेळाच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा उपहारापूर्वीच पहिला डाव 325 धावात रोखला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात इंग्लंडवर 91 धावांची आघाडी मिळविली आहे. उपाहारापर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 6 षटकात बिनबाद 12 धावा जमविल्या होत्या.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 416 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर इंग्लंडने गुरुवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर पहिल्या डावात 4 बाद 278 धावा जमविल्या होत्या. या धावसंख्येवरुन इंग्लंडने शुक्रवारी तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला पण ऑस्ट्रेलियाच्या अचूक गोलंदाजीसमोर इंग्लंडचे शेवटचे 6 फलंदाज 47 धावांची भर घालत तंबूत परतले. इंग्लंडचा पहिला डाव 76.2 षटकात 325 धावात आटोपला. ब्रूक आणि स्टोक्स या नाबाद जोडीने इंग्लंडच्या डावाला पुढे सुरुवात केली. हॅरी ब्रूकने आपले अर्धशतक 63 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने झळकाविले. तर इंग्लंडच्या 300 धावा 70.2 षटकात फलकावर लागल्या. ऑस्ट्रेलियाच्या स्टार्कने कर्णधर स्टोक्सला ग्रीनकरवी झेलबाद केले. त्याने 58 चेंडूत 1 चौकारांसह 17 धावा जमविल्या. त्यानंतर स्टार्कने इंग्लंडला आणखी एक धक्का देताना ब्रूकला कमिन्सकडे झेल देण्यास भाग पाडले. ब्रूकने 68 चेंडूत 4 चौकारांसह 50 धावा जमविल्या. हॅझलवूडने बेअरस्टोचा बळी मिळविला. कमिन्सने हा अप्रतिम झेल टिपला. त्याने 36 चेंडूत 2 चौकारांसह 16 धावा जमविल्या. हेडने इंग्लंडचे रॉबिनसन आणि ब्रॉड यांना बाद केले. ब्रॉडने 1 चौकारासह 12 तर रॉबिनसनने 1 चौकारासह 9 धावा जमविल्या. कमिन्सने नवोदित टंगला झेलबाद करुन इंग्लंडला 325 धावांवर रोखले. ऑस्ट्रेलियातर्फे स्टार्कने 3, हॅझलवूड आणि हेड यांनी प्रत्येकी 2 तसेच कमिन्स, लियॉन व ग्रीन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. दुखापतीमुळे फिरकी गोलंदाज नाथन लियॉन उपाहारापर्यंतच्या खेळात मैदानात अनुपस्थित होता. उपाहारावेळी ऑस्ट्रेलियाने 6 षटकात बिनबाद 12 धावा जमवित इंग्लंडवर एकूण 103 धावांची आघाडी मिळविली आहे.
संक्षिप्त धावफलक – ऑस्ट्रेलिया प. डाव 100.4 षटकात सर्व बाद 416, इंग्लंड प. डाव 76.2 षटकात सर्व बाद 325 (डकेट 98, क्रॉले 48, पॉप 42, रुट 10, ब्रूक 50, स्टोक्स 17, बेअरस्टो 16, ब्रॉड 12, रॉबिन्सन 9, अवांतर 22, स्टार्क 3-88, हॅझलवूड 2-71, हेड 2-17, कमिन्स 1-46, ग्रीन 1-54).









