स्टोक्सची फटकेबाजी, कमिन्सचे 6 बळी
वृत्तसंस्था/ लिडस्
अॅशेस कसोटी मालिकेतील येथे सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीतील शुक्रवारी खेळाच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने यजमान इंग्लंडवर पहिल्या डावात केवळ 26 धावांची आघाडी मिळविली. कर्णधार बेन स्टोक्सच्या आक्रमक फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलियाने मोठी आघाडी घेण्याची संधी गमाविली. स्टोक्सने 80 धावांचे योगदान दिले तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार कमिन्स याने 91 धावात 6 गडी बाद केले. चहापानावेळी ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 1 बाद 29 धावा जमवित इंग्लंडवर एकूण 55 धावांची आघाडी मिळविली होती.
पाच सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिले सलग दोन सामने जिंकून इंग्लंडवर 2-0 अशी आघाडी मिळविली आहे. ऑस्ट्रेलियन संघ लिडस्ची तिसरी कसोटी जिंकून मालिका काबीज करण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान या तिसऱ्या कसोटीत खेळाच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 263 धावात आटोपला होता. मिचेल मार्शने शानदार शतक (118) झळकविले होते तर हेडने 39 धावा जमविल्या होत्या. इंग्लंडच्या मार्क वूडने 34 धावात 5 तर वोक्सने 73 धावात 3 आणि ब्रॉडने 58 धावात 2 गडी बाद केले होते.
ऑस्ट्रेलियाचा डाव संपल्यानंतर वेगवान गोलंदाजीला अनुकूल असलेल्या या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी केल्याने सामन्यातील पहिल्या दिवसाअखेर इंग्लंडची पहिल्या डावात स्थिती 3 बाद 68 अशी केविलवाणी होती. या धावसंख्येवरुन इंग्लंडने दुसऱ्या दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला. उपाहारापर्यंतच्या पहिल्या सत्रात इंग्लंडने आणखी 4 गडी गमाविताना 74 धावांची भर घातली. उपाहारावेळी इंग्लंडने पहिल्या डावात 7 बाद 142 धावा जमविल्या होत्या.
इंग्लंडच्या डावाला प्रारंभ झाल्यानंतर शुक्रवारी कर्णधार कमिन्सने रुटला 19 धावावर झेलबाद केले. त्यानंतर स्टार्कने यष्टीरक्षक व फलंदाज बेअरस्टोला स्मिथकरवी झेलबाद केले. स्टिव्ह स्मिथने आपल्या चपळ क्षेत्ररक्षणाचे दर्शन घडविताना इंग्लंडच्या पहिल्या डावात 5 झेल टिपले. कमिन्सने मोईन अलीला स्मिथकरवी झेलबाद केले. मोईन अलीने 2 चौकारांसह 21 धावा जमविल्या. कर्णधार स्टोक्स उपाहारावेळी 27 धावावर खेळत होता. उपाहारानंतरच्या दुसऱ्या सत्रामध्ये कमिन्सने मार्क वूडला मार्शकरवी झेलबाद केले. त्याने 3 षटकार आणि 1 चौकारासह केवळ 8 चेंडूत 24 धावा जमविल्या. ब्रॉड 7 धावा जमवित तंबूत परतला. स्टोक्सने आपले अर्धशतक 86 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने झळकाविले. स्टोक्स उत्तुंग फटका मारण्याच्या नादात मर्फीच्या गोलंदाजीवर स्मिथकरवी शेवटच्या गड्याच्या रुपात झेलबाद झाला. स्टोक्सने 108 चेंडूत 5 षटकार आणि 6 चौकारांसह 80 धावा झोडपल्या. रॉबिनसन 5 धावावर नाबाद राहिला. इंग्लंडचा पहिला डाव 52.3 षटकात 237 धावावर समाप्त झाला. ऑस्ट्रेलियातर्फे कर्णधार कमिन्सने 91 धावात 6 तर स्टार्कने 59 धावात 2 तसेच मार्श आणि मर्फी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. इंग्लंडचा संघ 26 धावांनी पिछाडीवर राहिला.
26 धावांची आघाडी घेतलेल्या ऑस्ट्रेलियाने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली आणि चहापानापर्यंत त्यांनी 12 षटकात 1 बाद 29 धावा जमवित इंग्लंडवर 55 धावांची आघाडी मिळविली. ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज वॉर्नर ब्रॉडच्या गोलंदाजीवर क्रॉलेकरवी स्लिपमध्ये झेलबाद झाला. चहापानावेळी ख्वाजा 3 चौकारांसह 20 तर लाबुशेन 1 चौकारासह 7 धावावर खेळत होते. इंग्लंडच्या ब्रॉडने 9 धावात 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – ऑस्ट्रेलिया प. डाव 60.4 षटकात सर्व बाद 263, इंग्लंड प. डाव 52.3 षटकात सर्व बाद 237 (क्रॉले 33, रुट 19, बेअरस्टो 12, स्टोक्स 80, मोईन अली 21, वोक्स 10, वूड 24, अवांतर 21, स्टार्क 2-59, कमिन्स 6-91, मार्श 1-9, मर्फी 1-36). ऑस्ट्रेलिया दु. डाव 12 षटकात 1 बाद 29 (ख्वाजा खेळत आहे 20, लाबुशेन खेळत आहे 7, वॉर्नर 1, अवांतर 1, ब्रॉड 1-9).
(धावफलक चहापानापर्यंत)









