विंडीजचा डाव 283 धावात समाप्त, स्टार्क, कमिन्स, लेयॉन प्रभावी
वृत्तसंस्था/ पर्थ
पहिल्या क्रिकेट कसोटीतील शुक्रवारी खेळाच्या दुसऱया दिवसाअखेर यजमान ऑस्ट्रेलियाने आपली स्थिती अधिक मजबूत करताना विंडीजवर 334 धावांची भक्कम आघाडी मिळविली. विंडीजचा पहिला डाव 283 धावात समाप्त झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱया डावात 1 बाद 29 धावा जमविल्या. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव 4 बाद 598 धावांवर घोषित केला होता.

स्टीव्ह स्मिथ आणि लाबुशेन यांनी आपल्या दमदार द्विशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात मजबूत स्थितीत नेले. लाबुशेनने 204 तर स्टीव्ह स्मिथने नाबाद 200 धावा झळकविल्या. हेडने 99 धावांचे योगदान दिले. विंडीजने बिनबाद 74 या धावसंख्येवरून दुसऱया दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. पण ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीसमोर त्यांचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद झाले. कर्णधार ब्रेथवेट आणि नवोदित चंद्रपॉल यांनी अर्धशतके झळकवताना सलामीच्या गडय़ासाठी 78 धावांची भागीदारी केली. दुखापतीमुळे विंडीजच्या बॉनेरला निवृत्त व्हावे लागले. कर्णधार ब्रेथवेटने 166 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 64 तर तेग नरेन चंद्रपॉलने 79 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 51 धावा जमविल्या. ब्लॅकवूडने 4 चौकारांसह 36, ब्रुक्सने 4 चौकारांसह 33, होल्डरने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 27, बॉनेरने 2 चौकारांसह 16 आणि चेसने 1 चौकारासह 13 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियातर्फे स्टार्कने 51 धावात 3, कमिन्सने 34 धावात 3, लेयॉनने 61 धावात 2 तर हॅझलवूड आणि ग्रीन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 305 धावांची भक्कम आघाडी मिळविली. उपलब्ध असतानाही ऑस्ट्रेलियाने विंडीजला फॉलोऑन दिला नाही. त्यानंतर दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱया डावात 11 षटकात 1 बाद 29 धावा जमविल्या. रॉचने सलामीच्या उस्मान ख्वाजाला 5 धावांवर बाद केले. वॉर्नर 18 तर लाबुशेन 3 धावांवर खेळत होते. या कसोटीतील खेळाचे तीन दिवस बाकी राहिले असून विंडीजचा संघ पराभवाच्या छायेत वावरत आहे.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया प. डाव 152.4 षटकात 4 बाद 598 (डाव घोषित) (लाबुशेन 204, स्मिथ नाबाद 200, हेड 99, उस्मान ख्वाजा 65, ब्रेथवेट 2-65, सिलेस-95, मेयर्स 1-39), विंडीज प. डाव 98.2 षटकात सर्वबाद 283 (पेग ब्रेथवेट 64, चंदपॉल 51, ब्लॅकवूड 36, ब्रुक्स 33, होल्डर 27, बॉनेर दुखापतीने निवृत्त 16, चेस 13, स्टार्क 3-51, कमिन्स 3-64, लेयॉन 2-61, ग्रीन 1-35, हॅझलवूड 1-53), ऑस्ट्रेलिया दु. डाव 11 षटकात 1 बाद 29 (ख्वाजा 5, वॉर्नर खेळत आहे 18, लाबुशेन खेळत आहे 3, रॉच 1-16).









