वृत्तसंस्था/ कोलंबो
ऍरोन फिंचच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ लंकेत तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी दाखल झाला असून या मालिकेला येथील प्रेमदासा स्टेडियमवर मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. उभय संघामध्ये आतापर्यंत 22 टी-20 सामने खेळविण्यात आले असून त्यापैकी ऑस्ट्रेलियाने 12 तर लंकेने 9 सामने जिंकले तर एक सामना टाय झाला आहे.
या मालिकेसाठी लंकेचे नेतृत्व दसुन शनाकाकडे सोपविण्यात आले आहे. सदर मालिका लंकेत होत असल्याने त्याचा लाभ निश्चितच यजमान संघाला मिळू शकेल. लंकेने आतापर्यंत आपल्या घरच्या मैदानावर चार सामने खेळले असून त्यापैकी दोन सामने जिंकले तर दोन सामने गमविले आहेत. ऑस्ट्रेलिया आणि लंका यांच्यात यापूर्वी 2022 फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलियात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळविली गेली होती आणि त्यामध्ये ऑस्ट्रेलियाने लंकेचा 4-1 असा पराभव केला होता. या मालिकेतील ऑस्ट्रेलियाने पहिला सामना डकवर्थ लेवीस नियमाच्या आधारे जिंकला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 9 बाद 149 धावा जमविल्यानंतर लंकेने 8 बाद 122 धावा जमविल्या असताना पावसामुळे खेळ थांबवावा लागला होता. या मालिकेतील दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने सुपर ओव्हरमध्ये जिंकला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 6 बाद 164 धावा जमविल्यानंतर लंकेनेही 8 बाद 164 धावा जमविल्याने हा सामना टाय झाला होता. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाने लंकेचा पराभव केला. या मालिकेतील तिसऱया सामन्यात ऑस्ट्रेलियाने लंकेचा 6 गडय़ांनी पराभव केला हाता. त्यात लंकेने 6 बाद 121 धावा जमविल्यानंतर ऑस्ट्रेलियाने 4 बाद 122 धावा जमवित विजय नोंदविला. या मालिकेतील चौथा सामना ऑस्ट्रेलियाने पुन्हा 6 गडय़ांनी जिंकला होता तर पाचवा आणि शेवटचा सामना लंकेने 5 गडय़ांनी जिंकला होता.
मंगळवारपासून सुरू होणाऱया तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत दोन्ही संघांना विजयाची समान संधी आहे. या मालिकेतील दुसरा सामना 8 जूनला प्रेमदासा स्टेडियम तर तिसरा आणि शेवटचा सामना 11 जूनला पल्लीकेलेच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघात मार्श, वॉर्नर, मॅ
क्सवेल, स्टीव्ह स्मिथ यांचे पुनरागमन झाले आहे.
लंका संघ- शनाका (कर्णधार), निशांका, गुणतिलका, कुशल मेंडीस, असालंका, भानूका राजपक्षे, एन. फर्नांडो, मधुशंका, हसरंगा, करूणारत्ने, चमिरा, रजिता, एन तुषारा, एम.पथिराणा, रमेश मेंडीस, महेश तिक्षणा, जयविक्रमा आणि संदकन.
ऑस्ट्रेलिया- फिंच (कर्णधार), ऍबॉट, ऍगर, हॅजलवूड, इंग्लीस, मिशेल मार्श, मॅक्सवेल, जे. रिचर्डसन, के. रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, स्टार्क, स्टोइनीस, स्वेप्सन, वॉर्नर आणि वेड.