विश्वचषकाचे काऊंटडाऊन सुरु : 18 सदस्यीय संघाची घोषणा : पॅट कमिन्सकडे नेतृत्व
वृत्तसंस्था/ लंडन
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिका आणि भारत दौऱ्यासह आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी आपल्या वनडे संघाची घोषणा केली. सोमवारी निवड समितीने 18 सदस्यीय संघाची घोषणा करताना नेतृत्वाची धुरा पॅट कमिन्सकडे सोपवली आहे. जाहीर केलेल्या संघात स्टार फलंदाज मार्नस लाबुशेनला डच्चू दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ऑस्ट्रेलियाला विश्वचषकातील सलामीचा सामना 8 ऑक्टोबर रोजी यजमान भारतासोबत खेळायचा आहे.

आयसीसी नियमानुसार 28 सप्टेंबरपर्यंत वर्ल्डकपसाठी अंतिम संघ जाहीर करण्याची मुदत होती. यानुसार ऑस्ट्रेलियन निवड समितीने 18 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. याशिवाय, वर्ल्डकपआधी ऑसी संघ दक्षिण आफ्रिका व टीम इंडियाविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी देखील ऑसी संघ जाहीर करण्यात आला आहे. द.आफ्रिका व भारताविरुद्ध मालिकेदरम्यान खेळाडूंची कामगिरी पाहण्यासाठी निवड समितीकडे दोन महिन्यांचा कालावधी आहे. यादरम्यान खेळाडूंचे प्रदर्शन पाहून ते आपल्या संघात आवश्यक बदल करू शकतात. विशेष म्हणजे, लाबुशेनला डच्चू देण्यात आला असून त्याऐवजी युवा खेळाडू तनवीर संघा आणि अष्टपैलू एरॉन हार्डी यांना संधी दिली गेली आहे.
18 खेळाडूंच्या नावाची घोषणा
आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी संघनिवड करताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने युवा व अनुभवी खेळाडूंना संधी दिली आहे. तसेच हा संघ केवळ विश्वचषक स्पर्धेसाठीच नाही तर दक्षिण आफ्रिका आणि भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठीदेखील असेल. या संघाची धुरा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सवर सोपवण्यात आली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली अनुभवी डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. आक्रमक खेळाडू मार्नस लाबूशेनचे विश्वचषक स्पर्धा खेळण्याचे स्वप्न मात्र भंगले आहे. लाबूशेनची भारताविरुद्ध कामगिरी फारशी समाधानकारक नाही. लाबूशेनने भारताविरुध्दच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत केवळ 43 धावा केल्या होत्या. आतापर्यंत तो 30 वनडे सामने खेळला आहे. यात त्याने 847 धावा केल्या आहेत.
अॅशेसच्या शेवटच्या कसोटीत कर्णधार कमिन्सला मनगटाची दुखापत झाली होती. त्याचे मनगट तुटले आहे, ज्यामुळे तो पुढील सहा आठवडे खेळापासून दूर राहील. मात्र, तो भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत पुनरागमन करेल. याशिवाय, जोस हॅजलवूडचे संघात पुनरागमन झाले आहे.
22 सप्टेंबरला ऑसी संघ भारतात
ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिका दौरा 30 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या द्रौयात तीन सामन्यांची टी-20 मालिका आणि पाच वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहेत. 7 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान एकदिवसीय सामने खेळवले जातील. या मालिकेनंतर 15 खेळाडू अंतिम होणार आहेत, जे भारत दौऱ्यावर जाणार आहेत. भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला 22 सप्टेंबरपासून प्रारंभ होईल.
द. आफ्रिका आणि भारत दौऱ्यासह विश्वचषक 2023 साठी ऑस्ट्रेलियन संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन ऍबॉट, अॅश्टन अगर, अॅलेक्स कॅरे, नॅथन एलिस, कॅमरुन ग्रीन, ऍरॉन हार्डी, जोश हॅजलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा.
द. आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ
ऑस्ट्रेलिया टी-20 संघ – मिचेल मार्श (कर्णधार), शॉन ऍबॉट, जेसन बेहरनडॉर्फ, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, एरॉन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, ग्लेन मॅक्सवेल, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टोनिस, अॅडम झाम्पा.









