उस्मान ख्वाजाच्या 47 धावा, ब्रॉड-वुडचे प्रत्येकी 2 बळी
वृत्तसंस्था/ ओव्हल
पाच सामन्यांच्या अॅशेस कसोटी मालिकेतील येथे गुरुवारपासून सुरु झालेल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत शुक्रवारी खेळाच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाची पहिल्या डावात घसरण झाली आहे. इंग्लंडच्या अचूक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाने चहापानापर्यंत पहिल्या डावात 7 बाद 186 धावा जमविल्या होत्या. तत्पूर्वी इंग्लंडचा पहिला डाव 283 धावात आटोपला होता.
या मालिकेत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 2-1 अशी आघाडी मिळविली आहे. इंग्लंडला ही शेवटची कसोटी जिंकून बरोबरी करण्याची संधी लाभली आहे. पण ऑस्ट्रेलियाने या मालिकेतील चौथी कसोटी अनिर्णित राहिल्याने अॅशेस स्वत:कडे राखले आहे. या शेटवच्या कसोटीत इंग्लंडच्या पहिल्या डावात हॅरी ब्रूकने 85 धावांची खेळी करत संघाला सावरले. डकेटने 41, मोईन अलीने 34, क्रॉलेने 22, वोक्सने 36, मार्कवूडने 28 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियातर्फे स्टार्क यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 82 धावात 4 तर हॅजलवूड आणि मर्फी यांनी प्रत्येकी 2 तसेच कमिन्स आणि मार्श यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
इंग्लंडचा पहिला डाव गुरुवारी पहिल्या दिवशीच्या खेळातील शेवटच्या सत्रात आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 1 बाद 61 धावा जमविल्या होत्या. या धावसंख्येवरुन त्यांनी शुक्रवारी दुसऱ्या दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला. दरम्यान मार्कवूडने लाबूशेनला 9 धावांवर झेलबाद केले. ऑस्ट्रेलियाचे शतक 47.4 षटकात फलकावर लागले. ख्वॉजा आणि स्मिथ ही जोडी उपाहारावेळी नाबाद राहिली होती. ऑस्ट्रेलियाने उपाहारावेळी 51 षटकात 2 बाद 115 धावा जमविल्या होत्या. उपाहारानंतर ब्रॉने उस्मान ख्वॉजाला पायचीत केले. त्याने 157 चेंडूत 7 चौकारांसह 47 धावा जमविल्या. स्टुअर्ट ब्रॉडने ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का देताना हेडला यष्टीरक्षक बेअरस्टो करवी झेलबाद केले. त्याने 4 धावा जमविल्या. अँडरसनने मिचेल मार्शचा त्रिफळा उडविला. त्याने 28 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 16 धावा जमविल्या. रूटने कॅरेला 10 धावांवर झेलबाद केले. तर चहापानापूर्वी मार्कवूडने स्टार्कला डकेटकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने 7 धावा जमविल्या. मात्र एका बाजूने स्मिथ चिवट फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न करीत आहे. चहापानावेळी ऑस्ट्रेलियाने 75 षटकात 7 बाद 186 धावा जमविल्या असून अद्याप ते 97 धावांनी पिछाडीवर आहेत. स्मिथ 3 चौकारांसह 40 तर कर्णधार कमिन्स एका धावेवर खेळत आहेत. इंग्लंडतर्फे स्टुअर्ट ब्रॉड, मार्कवूड यांनी प्रत्येकी 2 तर अँडरसन, वोक्स आणि रुट यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – इंग्लंड प. डाव 54.4 षटकात सर्व बाद 283, ऑस्ट्रेलिया प. डाव 75 षटकात 7 बाद 186 (उस्मान ख्वॉजा 7 चौकारांसह 47, वॉर्नर 3 चौकारांसह 24, लाबूशेन 9, हेड 4, मार्श 1 षटकार आणि 1 चौकारासह 16, कॅरे 1 षटकार आणि 1 चौकारासह 10, स्मिथ 3 चौकारांसह 40 धावांवर खेळत आहे, स्टार्क 7, कमिन्स खेळत आहे 1, अवांतर 28, ब्रॉड 2-31, वूड 2-37, अँडरसन 1-46, वोक्स 1-25, रुट 1-20).
धावफलक चहापानापर्यंत.