वृत्तसंस्था/ गॅले
ट्रव्हिस हेड आणि नॅथन लियॉन यांच्या भेदक फिरकी गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने शुक्रवारी येथे पहिल्या क्रिकेट कसोटीत खेळाच्या तिसऱया दिवशी यजमान लंकेचा दहा गडय़ांनी दणदणीत पराभव करून दोन सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळविली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून ग्रीनला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या कसोटीत लंकेने पहिल्या डावात 212 धावा जमविल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 70.5 षटकांत सर्वबाद 321 धावा जमवित 109 धावांची भक्कम आघाडी मिळविली होती. ऑस्ट्रेलियाने 8 बाद 313 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरूवात केली आणि त्यांचे शेवटचे दोन गडी 8 धावांची भर घालत तंबूत परतले. ऑस्ट्रेलियाच्या डावात उस्मान ख्वाजाने 71, वॉर्नरने 25, लाबुशानेने 13, स्मिथने 6, हेडने 6, कॅमेरून ग्रीनने 77, कॅरेने 45, स्टार्कने 10, कर्णधार कमिन्सने 3 षटकार आणि 1 चौकारांसह 26, लियॉनने 2 चौकारांसह 15 धावा जमविल्या. लंकेतर्फे रमेश मेंडीसने 112 धावांत 4, असिता फर्नांडो आणि व्हँडेरसी यांनी प्रत्येकी 2 आणि धनंजय डिसिल्वाने 1 गडी बाद केला.
हेड आणि लियॉन यांच्या फिरकी माऱयासमोर लंकेचा दुसरा डाव 22.5 षटकांत केवळ 113 धावांत गारद झाला. लंकेच्या दुसऱया डावात कर्णधार करूणारत्नेने 20 चेंडूत 5 चौकारांसह 23, निशांकाने 1 चौकारांसह 14, ओशादा फर्नांडोने 1 षटकार आणि 1 चौकारांसह 12, धनंजय डिसिल्वाने 11 आणि चंडीमलने 1 चौकारांसह 13 धावा जमविल्या. लंकेच्या एकाही फलंदाजांला 30 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. ऑस्ट्रेलियातर्फे लियॉनने 31 धावांत 4, हेडने 10 धावांत 4 आणि स्वेप्सनने 34 धावांत 2 गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाला निर्णायक विजयासाठी केवळ 5 धावांची जरूरी होती. वॉर्नर आणि ख्वाजा या सलामीच्या जोडीने 4 चेंडूतच 10 धावा जमवित आपल्या संघाला 10 गडय़ांनी विजय मिळवून दिला. वॉर्नरने 4 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह नाबाद 10 धावा जमविल्या.
संक्षिप्त धावफलक ः लंका प. डाव- 59 षटकांत सर्वबाद 212, ऑस्ट्रेलिया प. डाव- 70.5 षटकांत सर्वबाद 321 (ख्वाजा 71, वॉर्नर 25, लाबुशाने 13, ग्रीन 77, कॅरे 45, स्टार्क 10, कमिन्स 26, लियॉन नाबाद 15, रमेश मेंडीस 4-112, ए.फर्नांडो 2-37, व्हँडेरसी 2-68, डिसिल्वा 1-8), लंका दु.डाव- 22.5 षटकांत सर्वबाद 113 (करूणारत्ने 23, निशांका 14, ओशादा फर्नांडो 12, डिसिल्वा 11, चंडीमल 13, लियॉन 4-31, हेड 4-10, स्वेप्सन 2-34), ऑस्ट्रेलिया दु. डाव-0.4 षटकांत बिनबाद 10 (वॉर्नर नाबाद 10, ख्वाजा नाबाद 0)
लंकेचा मॅथ्यूज कोरोना बाधित
लंकन संघातील वयस्कर अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूजला कोरोनाची बाधा झाली असल्याने तो येथे झालेल्या पहिल्या कसोटीतील शुक्रवारी चौथ्या दिवशी मैदानात उतरू शकला नाही. त्याच्या जागी ओशादो फर्नांडोला खेळविण्यात आले. मॅथ्यूजची कोरोना चाचणी घेण्यात आली, त्यामध्ये तो पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. ही चाचणी बुधवारी घेण्यात आली होती. मॅथ्यूजची तब्बेत बिघडल्याने त्याची ही चाचणी घेण्यात आली होती. त्याला आता आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे, अशी माहिती लंकन क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने दिली.









