तिसरी कसोटीही तिसऱयाच दिवशी निकाली, डब्ल्यूटीसीची अंतिम फेरीही निश्चित
वृत्तसंस्था/ इंदोर
ऑस्ट्रेलियाने तिसऱया कसोटीच्या तिसऱया दिवशी सहजपणे भारतावर 9 गडय़ांनी दणदणीत विजय मिळवित चार कसोटीच्या मालिकेत भारताची आघाडी 2-1 अशी कमी केली. सामन्यात 11 बळी मिळविणाऱया नाथन लियॉनला सामनावीरचा बहुमान मिळाला. ही कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील स्थानही निश्चित केले. भारताला मात्र अंतिम फेरी गाठण्यासाठी शेवटची कसोटी जिंकावी लागणार आहे.
ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 76 धावांचे किरकोळ आव्हान भारताकडून मिळाले होते. खेळपट्टीचे स्वरूप पाहता भारतीय गोलंदाज त्यांना झगडण्यास भाग पाडून किमान चार बळी मिळवतील अशी अपेक्षा होती. मात्र ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी तशी कोणतीही संधी भारतीयांना दिली नाही. पहिल्या डावाप्रमाणे सावध व शिस्तबद्ध फलंदाजी करीत उद्दिष्ट मोठे नसल्याने कोणतीही घाई न करता 19 व्या षटकांत विजय साकार केला. पहिल्या डावातील अर्धशतकवीर उस्मान ख्वाजा मात्र दुसऱयाच चेंडूवर शून्यावर बाद झाला. अश्विनने त्याला बाद केल्यानंतर आशा निर्माण झाल्या होत्या. त्यानंतर ट्रव्हिस हेड व मार्नस लाबुशेन यांची भारतीय गोलंदाजांनी परीक्षा घेतली. पण त्यातून सावरल्यानंतर या दोघांनी आणखी पडझड होऊ न देता दुसऱया गडय़ासाठी अभेद्य 78 धावांची भागीदारी केली. यात हेडने आक्रमक फटकेबाजी केली. त्याने 53 चेंडूत 6 चौकार, एक षटकारासह नाबाद 49 तर लाबुशेनने 58 चेंडूत 6 चौकारांसह नाबाद 28 धावा जमविल्या. अश्विनने ख्वाजाचा एकमेव बळी मिळविला.

ऑस्ट्रेलियाने या सामन्यात सुधारित व परिपूर्ण प्रदर्शन करीत भारतालाच फिरकीचा ‘डोस’ देत भारतीय भूमीत एक दुर्मीळ विजय मिळविला. विदेशी संघांना भारतात विजय मिळविणे सहज सोपे जात नाही. तोच अनुभव कांगारूंनाही पहिल्या दोन कसोटीत आला. मात्र या कसोटीत त्यांनी भारतीय भूमीतील सहा वर्षातील पहिला विजय नोंदवण्यात यश मिळविले. भारतासाठी हा गेल्या दहा वर्षांत मायदेशात झालेला तिसरा पराभव आहे. चौथी व शेवटची कसोटी अहमदाबादमध्ये 9 मार्चपासून सुरू होणार असून डब्ल्यूटीसीची अंतिम फेरी गाठण्यासाठी तो सामना जिंकावाच लागणार आहे. त्यासाठी भारताला आपल्या योजना व डावपेचांमध्ये बदल करावे लागतील.
मालिकेतील भारतीय खेळपट्टय़ांवरही क्रिकेट जगतातून टीका होऊ लागली आहे. फिरकीस अनुकूल खेळपट्टय़ांवरील तीनही कसोटी तीन दिवसांत निकाली झाल्या आहेत. तरीही रोहित शर्माने सामन्यानंतर म्हटल्याप्रमाणे नरेंद्र मोदी स्टेडियमवरील खेळपट्टीही फिरकीस अनुकूल ठरणारीच असेल, असे मानले जात आहे. स्पिनर पेंडली खेळपट्टय़ांवर निकाल मिळत असतील तर तशा खेळपट्टय़ा बनविण्यात गैर काय आहे, असे कर्णधार रोहितने या टीकेला उत्तर देताना म्हटले आहे. येथील खेळपट्टीवर भारतीय फलंदाज फिरकीसमोर ढेपाळताना दिसले, त्यांनी आपल्या खेळात सुधारणा करून अशा खेळपट्टय़ांवर धावा जमवण्याचा स्वताच्या पद्धतीने मार्ग शोधून काढायला हवा, अशी अपेक्षा रोहितने व्यक्त केली आहे. भारताला या सामन्यात 109 व 163 धावा जमविता आल्या आणि दोन्ही डावात आघाडी फळीने साफ निराशा केली. आपल्या फलंदाजांची कामगिरी निराशाजनक होती, असे रोहित म्हणाला.
दिवसातील दुसऱयाच चेंडूवर ख्वाजा अश्विनच्या एकदम वळलेल्या चेंडूवर यष्टिरक्षकाकरवी झेलबाद झाला, तेव्हा ऑस्ट्रेलियन गोटात अस्वस्थता निर्माण झाली होती. नागपूर, दिल्लीप्रमाणे पुन्हा त्यांचा डाव गडगडेल अशी भीती निर्माण झाली होती. पण हेड व लाबुशेन यांनी तसे काहीही होऊ दिले नाही. त्यांनी अतिशय सावध खेळ करीत पहिल्या 10 षटकांत फक्त 13 धावा जमविल्या. 10 व्या षटकात चेंडू बदलल्यानंतर या स्थितीत बदल झाला. यावर अश्विन खुश नव्हता आणि त्याचा परिणाम गोलंदाजीवरही झाल्याचे दिसून आले. हेडने त्याला 11 व्या षटकात चौकार व षटकार ठोकला. नंतर त्याने जडेजावरही हल्ला करीत त्याच्या डोक्यावरून सरळ चौकार मारला. यामुळे लाबुशेनचा आत्मविश्वासही वाढला. त्याने जडेजाला स्वीपचा चौकार मारल्यानंतर 12 षटकांत 1 बाद 35 अशी स्थिती झाली. यानंतर मात्र त्यांनी सहजतेने फलंदाजी करीत विजय साकार केला. लाबुशेनने मिडविकेटच्या देशने विजयी चौकार मारत सामना संपवला.
संक्षिप्त धावफलक ः भारत प.डाव 109, ऑस्ट्रेलिया प.डाव 197, भारत दु.डाव 163, ऑस्ट्रेलिया दु.डाव 18.5 षटकांत 1 बाद 78 ः ख्वाजा 0, हेड नाबाद 49 (53 चेंडूत 6 चौकार, 1 षटकार), लाबुशेन नाबाद 28 (58 चेंडूत 6 चौकार), अवांतर 1. गोलंदाजी ः अश्विन 1-44, जडेजा 0-23, उमेश यादव 0-10.









