वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रिकेट सांघिक मानांकनात ऑस्ट्रेलियाने पुन्हा अग्रस्थानावर झेप घेताना भारताला खाली खेचले आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेत दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडविल्याने भारताला अग्रस्थान गमवावे लागले. सध्या ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू असून ऑस्ट्रेलियाने 2-0 अशी एकतर्फी आघाडी मिळविली आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या सिडनीत सुरू असलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत पाकवर मोठा विजय मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. आयसीसी कसोटी मानांकनात यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया हे अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर होते. या दोन्ही संघांनी प्रत्येकी समान 118 मानांकन गुण मिळविले असले तरी भारत डेसिमल फरकाने आघाडीवर राहिला. भारतीय संघाने केपटाऊनची दुसरी कसोटी केवळ दीड दिवसात जिंकून दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडविण्यात यश मिळविले. आता या मानांकन यादीत दक्षिण आफ्रिका संघानेही बऱ्यापैकी प्रगती केली आहे. विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात सध्या भारताचा संघ आघाडीवर आहे. भारताने 4 कसोटीत 54.16 टक्के गुण मिळविले असून त्यांनी 2 सामने जिंकले तर 1 सामना गमविला आणि 1 सामना बरोबरीत राखला. या मानांकन यादीत दक्षिण आफ्रिका दुसऱ्या, न्यूझीलंड तिसऱ्या तर ऑस्ट्रेलिया चौथ्या स्थानावर आहे.









