तीन सामन्यांची टी-20 मालिका, हिलीचे अर्धशतक
वृत्तसंस्था/ मॅके
भारताचा अ महिला क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ महिला संघामध्ये सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 अनाधिकृत मालिकेत ऑस्ट्रेलिया अ महिला संघाने दुसऱ्या सामन्यात भारत अ संघाचा 114 धावांनी दणदणीत पराभव करत 2-0 अशी विजयी आघाडी मिळवली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाची अनुभवी सलामीची फलंदाज अॅलिसा हिलीने दमदार अर्धशतक (70) झळकाविले.
या मालिकेत भारत अ महिला संघाला पहिल्या सामन्यातही पराभव पत्करावा लागला होता. या दुसऱ्या सामन्यात भारत अ संघाने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलिया अ संघाला प्रथम फलंदाजी दिली. ऑस्ट्रेलिया अ महिला संघाने 20 षटकात 4 बाद 187 धावा जमविल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलिया अ च्या भेदक माऱ्यासमोर भारत अ महिला संघाचा डाव 15. 1 षटकात केवळ 73 धावांत आटोपला.
ऑस्ट्रेलिया अ संघाच्या डावामध्ये अॅलिसा हिली आणि ताहिला विल्सन या सलामीच्या जोडीने 64 चेंडूत 95 धावांची भागिदारी केली. विल्सनने 35 चेंडूत 6 चौकारांसह 43 धावा जमविल्या. अॅलिसा हिलीने 44 चेंडूत 12 चौकारांसह 70 धावा झोडपल्या. अनिका लिरॉईडने 21 चेंडूत 5 चौकारांसह 35 तर वेबने 13 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 26 धावा जमविल्या. कर्णधार फेटूम 8 धावांवर धावचीत झाली. ऑस्ट्रेलिया अ संघाच्या डावामध्ये 27 चौकार नोंदविले गेले. भारत अ संघातील राधा यादवने 35 धावांत 2 तर प्रेमा रावतने 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना भारत अ महिला संघाच्या डावामध्ये केवळ 2 फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. दिनेश वृंदाने 27 चेंडूत 2 चौकारांसह 21 तर मीनूमनीने 15 चेंडूत 3 चौकारांसह 20 धावा केल्या. शेफाली वर्माने 3, बिस्तने 5, सजीवन सजनाने 6, कर्णधार राधा यादवने 5, प्रेमा रावतने 4 धावा जमविल्या. उमा छेत्री आणि तनुजा कंवर यांना खातेही उघडता आले नाही. भारत अ संघाला 8 अवांतर धावा मिळाल्या. भारताच्या डावात 6 चौकार नोंदविले गेले. भारताचा निम्मा संघ 33 धावांत तंबूत परतला. ऑस्ट्रेलिया अ संघातर्फे कीम गॅरेथने 7 धावांत 4 तर अॅमी एडगर आणि टेस फ्लिनटॉप यांनी प्रत्येकी 2, हॅमिल्टन व जिंजिर यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक – ऑस्ट्रेलिया अ 20 षटकात 4 बाद 187 (हिली 70, विल्सन 43, लिरॉईड 35, वेब नाबाद 26, अवांतर 5, राधा यादव 2-35, रावत 1-26), भारत अ 15.1 षटकात सर्वबाद 73 (दिनेश वृंदा 21, मीनूमनी 20, अवांतर 8, गॅरेथ 4-7, एडगर व फ्लिनटॉप प्रत्येकी 2 बळी, हॅमिल्टन व जिंजिर प्रत्येकी 1 बळी).









