भारत अ महिला संघाचा 4 धावांनी पराभव
वृत्तसंस्था/ मॅके
यजमान ऑस्ट्रेलिया अ महिला क्रिकेट संघाने तीन सामन्यांची अनाधिकृत टी-20 मालिका एकतर्फी जिंकताना भारत अ महिला संघाचा 3-0 असा पराभव केला. या मालिकेतील खेळविण्यात आलेल्या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया अ महिला संघाने केवळ 4 धावांनी विजय मिळविला. या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 144 धावा जमविल्या. त्यानंतर भारत अ महिला संघाने 20 षटकात 8 बाद 140 धावापर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना थोडक्यात गमवावा लागला.
ऑस्ट्रेलिया अ महिला संघाच्या डावात मॅडेलिन पेनाने 32 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 39, अॅलिसा हिलीने 21 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 27, अनिका लिरॉईडने 17 चेंडूत 1 षटकार 1 चौकारासह 22, विल्सनने 2 चौकारांसह 14, कर्णधार फेल्टूमने 1 चौकारासह 11, फ्लिंटॉपने 1 चौकारासह 11, जिंजरने 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 17 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलिया अ संघाच्या डावात 4 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. भारत अ संघातर्फे राधा यादवने तसेच प्रेमा रावतने प्रत्येकी 3 बळी तर सजीवन सजनाने 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना भारत अ महिला संघाच्या डावामध्ये सलामीच्या शेफाली वर्माने 25 चेंडूत 1 षटकार 6 चौकारांसह 41, मिन्नू मणीने 29 चेंडूत 4 चौकारांसह 30, राघवी बिस्तने 25 चेंडूत 2 चौकारांसह 25, प्रेमा रावतने 8 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 12 धावा केल्या. भारत अ महिला संघाला 11 अवांतर धावा मिळाल्या. ऑस्टेलिया अ महिला संघातर्फे सायना जिंजरने 16 धावात 4 तर हॅमिल्टन तसेच एडगर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – ऑस्ट्रेलिया अ महिला संघ 20 षटकात 8 बाद 144 (पेना 39, हिली 27, लिरॉईड 22, विल्सन 14, फेलटूम 11, फ्लिंटॉप 11, जिंजर नाबाद 17, राधा यादव व प्रेमा रावत प्रत्येकी 3 बळी, सजना 1-12), भारत अ महिला संघ 20 षटकात 8 बाद 140 (शेफाली वर्मा 41, बिस्त 25, मिन्नू मणी 30, रावत नाबाद 12, अवांतर 11, जिंजर 4-16, हॅमिल्टन, एडगर प्रत्येकी 1 बळी).
…









