2 कसोटी आणि 3 वनडे खेळणार : 16 सप्टेंबरपासून पहिली लढत
वृत्तसंस्था/सिडनी
आगामी भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया अ संघाची घोषणा करण्यात आली आहे. पुढील महिन्यात दोन्ही संघांमध्ये 2 अनधिकृत कसोटी सामने आणि 3 अनधिकृत एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाईल. दोन्ही चार दिवसांचे कसोटी सामने लखनौच्या एकाना स्टेडियमवर खेळवले जातील. त्यानंतर कानपूरमधील ग्रीन पार्क येथे एकदिवसीय मालिका होणार आहे. अशाप्रकारे एकूण 5 सामन्यांसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने 14-14 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.
गतवर्षी इंडिया अ विरुद्धच्या दोन प्रथम श्रेणी सामन्यांसाठी निवड झालेला कॉन्स्टास हा एकमेव सध्याचा कसोटी खेळाडू होता. ऑस्ट्रेलियाचे संपूर्ण लक्ष 2027 च्या सुरुवातीला होणाऱ्या पुढील बॉर्डर-गावसकर ट्रॉफी दौऱ्यासाठी उदयोन्मुख खेळाडूंना तयार करण्यावर आहे. ऑस्ट्रेलिया अ संघाच्या 14 सदस्यीय चार दिवसीय संघात कूपर कॉनोली, टॉड मर्फी आणि नॅथन मॅकस्विनी यांचा समावेश आहे. तसेच ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ संघातील सॅम कॉन्स्टासलाही भारत द्रौयासाठी संधी देण्यात आली आहे. सॅमने काही महिन्यांपूर्वी झालेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेत टीम इंडिया विरुद्ध पदार्पण केले होते.
चार दिवसीय सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन ए टीम : झेव्हीयर बार्टलेट, सॅम कॉन्स्टास, फर्गस ओनील, कूपर कोनोली, झॅक एडवर्ड्स, आरोन हार्डी, कँपबेल केलावे, नॅथन मॅकस्वीनी, लांस मॉरिस, टॉड मर्फी, ओलिवर पीक, जोश फिलिप, कोरी रोचियोली आणि लियाम स्कॉट.
ऑस्ट्रेलिया ए वनडे टीम : कूपर कोनोली, झॅक एडवर्ड्स, हॅरी डिक्सन, सॅम इलियट, जेक फ्रेजर-मॅकगर्क, आरोन हार्डी, मँकेंजी हार्वे, टॉड मर्फी, तन्वीर संघा, लियाम स्कॉट, लॅची शॉ, टॉम स्ट्रॅकर, विल सदरलँड आणि कॅलम विडलर.
ऑस्ट्रेलिया अ संघाचा भारत दौरा –
16-19 सप्टेंबर – पहिला चार दिवसांचा सामना,एकाना स्टेडियम, लखनौ
23-26 सप्टेंबर – दुसरा चार दिवसांचा सामना,एकाना स्टेडियम, लखनौ
30 सप्टेंबर – पहिला एकदिवसीय सामना, ग्रीन पार्क, कानपूर
3 ऑक्टोबर – दुसरा एकदिवसीय सामना, ग्रीन पार्क, कानपूर
5 ऑक्टोबर – तिसरा एकदिवसीय सामना, ग्रीन पार्क, कानपूर









