कोल्हापूर :
साडेतीन मुहूर्तांपैकी एक व मांगल्याचा सण असलेला गुढीपाडवा अवघ्या दोन दिवसांवर आल्याने बाजारपेठेत नवीन वास्तूसह सोने-चांदीचे दागिने, नूतन वास्तूचे प्रवेश, एलईडी, फ्रिज, वॉशिंग,मोबाईल, लॅपटॉप, वाहने आदींच्या खरेदीसाठी उधाण आले आहे. ग्राहकांचा उत्साह पाहता शहरातील विविध मॉलसह सर्वच बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. व्यापाऱ्यांनीही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध वस्तूवर एकावर एक फ्री, 30 टक्के डिस्काऊंट अशा विविध ऑ फर ठेवल्या आहेत.
गुढी पाडव्याचा शुभमुहूर्त साधत सोनेखरेदीला पसंती दिली जाणार आहे. सणानिमित्त अनेकांनी सोने-चांदी खरेदी आणि गृहप्रवेशासाठी गुढी पाडव्याचा शुभमुहूर्त साधण्याचा बेत आखला आहे. यादिवशी सोने-चांदीचे दागिने खरेदी केली जाणार असल्याने सराफ व्यवसायाला झळाळी येणार आहे. काहींनी पसंतीनुसार दागिने बनविण्यासाठी ऑर्डर दिली आहे. गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर दुचाकी-चारचाकी वाहने घरी नेण्यासाठी मागील काही दिवसांपासून ग्राहक चौकशीसाठी विविध शोरूममध्ये येत आहेत. नंतर गोंधळ होऊ नये, यासाठी अनेकांनी वाहनांचे बुकिंगही करून ठेवले आहे.
गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर अनेकांनी नवा व्यवसाय, उद्योगाला सुरूवात करण्याचा बेत आखला आहे. काहींनी नवीन दुकानांच्या उद्घाटनाचे नियोजन करून ठेवले आहे. अमावास्येआधी गुढीची काठी नेण्याची प्रथा असल्याने चिव्याची काठी व इतर साहित्य नेण्याकडे अनेकांचा कल आहे. चिव्याची काठी, साखरेच्या माळा, फळे, चाफ्यांच्या फुलांची माळ, कलश, मिनी गुढीसह अन्य वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत. याच्या खरेदीसाठी लगबग सुरू असून बाजारपेठांमध्ये उत्साह पहायला मिळत आहे. गुढीपाडव्यासाठी लागणाऱ्या चिवकाठीच्या खरेदीसाठी शहरासह उपनगरामध्ये नागरिकांची गर्दी होत आहे. शहरातील ठिकठिकाणी साखरेच्या माळांची विक्रीही होत आहे. एका माळेची किंमत 20 ते 50 रुपये आहे. गुढीसाठी खास नवीन साड्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
साधारणत: 80 ते 200 रुपयांप्रमाणे या चिव्यांची विक्री होत आहे. शहरातील लक्ष्मीपुरी, महाद्वार रोड, बिंदू चौक, दसरा चौक, मिरजकर तिकटी, बुरूड गल्ली, राजारामपुरी, शाहूपुरी, व टिंबर मार्केट त्याचबरोबर उपनगरातील आपटेनगर, सानेगुरूजी वसाहत, कळंबा, फुलेवाडी, कसबा बावडा, आर. के. नगर, छत्रपती संभाजीनगर ठिकाणी, आयसोलशन आदी ठिकाणी चिव्यांचे विक्रीसाठी ढीग लागले आहेत. नवीन वस्तूंच्या खरेदीला उधाण गुढी पाडव्याचा मुहूर्त साधत अनेकांनी बुकिंग केले आहे. गुढी पाडव्यानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता, बुकिंग झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी घरपोच सेवा देण्याचे नियोजन केले आहे. काहींचे नव्या घराचे स्वप्न मुहूर्तावर साकार होणार असून, याची धांदल सुरू आहे. बाजारात सायंकाळी उशिरापर्यंत गर्दी आहे.
- गुढीची साडी रेडिमेड
गुढीसाठी खास पैठणी, भरजरी काठाची, सुंदर नक्षीकाम केलेल्या साड्यांची क्रेझ वाढली आहे. व्यापाऱ्यांनीही आकर्षक अशा साड्या विक्रीसाठी उपलब्ध केल्या आहेत. याच्या खरेदीकडे महिला वर्गाचा अधिक कल आहे.
- मिनी गुढीचे आकर्षण
फ्लॅट किंवा अपार्टमेंटसारख्या ठिकाणी गुढी उभी करण्यासाठी जागा अपुरी पडत असते. यासाठी हव्या त्या आकारात मिनी गुढी तयार करून दिल्या जात आहेत. याला पसंती दिली जात आहे. याचेही बुकिंग करून ठेवले आहे. 200 रुपयांपासून 1 हजार रुपयांपर्यंत विविध आकार व डिझाईनमध्ये मिनी गुढी उपलब्ध आहेत.








